Wednesday, February 27, 2019

बर्फ आणि कुकुटयंत्र

🔶गोष्टीचे नाव-बर्फ आणि कुकुटयंत्र

🔶अनुवादक-सविता करंजकर

🔶मूळ स्रोत-युरोपियन कथा

हिवाळा सुरू असतानाच मी रोम सोडले आणि रशियाकडे प्रस्थान केले.दवबिंदू आणि बर्फामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती.ज्या ज्या प्रवाश्यांनी या रस्त्यावरून प्रवास केला त्या त्या प्रवाश्यांनी  या रस्त्याचे "अत्यंत वाईट रस्ता" असे वर्णन केले आणि रस्ता दुरूस्त करणे आवश्यक असून तो लवकर दुरूस्त होईल,अशी आशा व्यक्त केली.अशा रस्त्यावरून घोडागाडीने प्रवास करणे सुखकर होईल म्हणून मी घोडागाडीने प्रवास सुरू केला.यादरम्यान मी वजनाला हलके असे कपडे घातले होते.(त्यामुळे मला ब- याच गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते)

पोलंडमधील एका रस्त्यावर मला एक माणूस दिसला.फारसे स्पष्ट दिसत नव्हते.पण तो माणूस कचरा गोळा करणारा असावा,असे वाटत होते.तो असहाय्यपणे थंडीने कुडकुडत  पडला होता.त्याचे अंग झाकले जाईल एवढे कपडेही त्याच्याकडे नव्हते.त्याच्या वेदना मला समजल्या.त्याला मदत करावी या हेतूने मी माझ्याकडील उबदार कपडे त्याच्या अंगावर टाकले.तेवढ्यात मला एक दैवी आवाज ऐकू आला , "माझ्या मुला,तुला याचे फळ नक्कीच मिळेल."

त्या रात्री भयाण अंधार होता.मला  अद्याप कोणतेही गाव दिसलेले  नव्हते.तो सगळा प्रदेश बर्फाच्छादित होता.झाडेही बर्फाने झाकली गेली होती.आता मी थकलो होतो.रस्त्यावरून प्रवास करणेही आता कठीण झाले होते.माझ्या घोड्याला मी माझ्या मागच्या बाजूला  (असलेल्या बर्फामधून बाहेर डोकावणा-या झाडाच्या बुंध्याला.)बांधले.माझ्या सुरक्षिततेसाठी एक पिस्तूल माझ्या हाताशी घेतले आणि तिथेच  बर्फावर पडून राहिलो डोळे घट्ट मिटून घेतले .आता सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या होत्या. दिवस उजाडेपर्यंत डोळे उघडायचे च नाहीत असे मी ठरवले.
रात्रभर हिमवर्षाव सुरू होता.आता हळूहळू हवामान बदलू लागले होते.मला जाणवू लागले की जिथं मी पडलो होतो तिथलं बर्फ वितळू लागले होते..आणि माझ्या लक्षात आले की मी एका चर्चयार्डमध्ये होतो..मी जवळपास पाहिलं पण मला माझा घोडा कुठे दिसला नाही.तेवढ्यात मला घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज आला मी आवाजाच्या दिशेने पाहिले .....झाडाचा बुंधा समजून मी घोड्याला बांधले होते  तो बुंधा नसून ते कुक्कुटयंत्र होते.

मग मी थोडा विचार केला.माझ्या पिस्तुलांपैकी एक पिस्तूल काढलं,लगामाला दोन गोळ्या घातल्या,घोड्याला खाली आणले आणि मी पुढच्या प्रवासाला लागलो.

(इथे बॅरोन थोडा भावनाशून्य झाला.इतके दिवस उपाशी असलेल्या आपल्या घोड्याला मका खाऊ घालण्याचे योजिले)

तात्पर्य- माणसांवर तसेच प्राणीमात्रांवर प्रेम करा त्यांची मदत करा.आपोआपच आपला जीवनप्रवास सुकर होईल

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी

हुशार बुलबुल

🔶गोष्टीचे नाव-हुशार बुलबुल

🔶अनुवादक-डॉ.अस्मिता भस्मे

🔶मूळ स्रोत-युरोपियन

सृष्टी वसंताच्या आगमनाने मोहोरली होती.निसर्गामधे नवचैतन्य पसरले होते. अशा या रम्य वातावरणात एक सरदार फेरफटका मारण्यास बाहेर पडला. फिरता फिरता वाटेत त्याला एक बुलबुल नजरेस पडला.सरदाराच्या मनी हाव उमटली.आपण याला आपल्या महालात सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त करूया म्हणजे याचे सुमधुर बोल दिवसभर आपल्या कानी पडतील. सरदाराने थोडा आटापिटा करून बुलबुलाला आपल्या कचाट्यात पकडलेच. बुलबुलाने आपल्या सुमधुर आवाजाने सरदाराला विनवणी केली की तू मला सोड...त्याबदल्यात मी तुला बहुमूल्य अशा दोन हितकर गोष्टी सांगून ज्या तुला आयुष्यात खूप लाभदायक ठरतील.

  सरदाराने बुलुबुलाची मुक्तता करण्याचे मान्य केले.
बुलबुलाने त्याला देन उपदेश दिले:
    १. ज्या गोष्टींची आपण पुनरावृत्ती करू शकणार नाही त्याबद्दल कधीच पश्चात्ताप करू नये.
  २. भूलथापांना कधीही बळी पडू नये.

  बुलबुलाचे हे उपदेश ऐकल्यानंतर सरदाराने त्याला स्वच्छंद हवेत उडण्यासाठी मुक्त केले.बुलबुलाने आपल्या इवल्याश्या पंखांनीआकाशात भरारी घेत सरदाराकडे वळून म्हटले,'अरेरे... तुला माझ्याकडे असलेला खजिना द्नात असता तर तू मला कधीच जाऊ दिले नसते.माझ्या पंखाखाली एक भव्य अनमोल रत्न आहे. जर ते तू घेतले असते तर तू अजून गर्भश्रीमंत झाला असतास.

   हे ऐकून सरदाराला पश्चात्ताप होऊ लागला व त्याने बुलबलाला परत पकडण्यासाठी धाव घेतली. त्याची ती तडफड पाहून बुलबुल म्हणाला, 'अरे मला माहित आहे तू हावरट आणि मूर्ख आहेस. तू मला परत पकडू शकणार नाहीस याचा तुला पश्चात्ताप होतोय. तू माझ्या भूलथापांना फसलास.एखादे भव्य रत्न मी माझ्या इवल्याश्या पंखाखाली कसे काय दवडू शकेन?

   एवढे बोलून बुलबुल आनंदाने निळ्याभोर आकाशात स्वच्छंद पणे फिरू लागले.

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी