Wednesday, March 27, 2019

बाई उडाली चंद्रापाशी

🔶गोष्टीचे नाव- बाई उडाली चंद्रापाशी

🔶अनुवादक- दीप्ती पुजारी

🔶मूळ स्रोत धागा-चिनी लोककथा

फार फार वर्षांपूर्वी आकाशात दहा सूर्य राहायचे. बापरेssss! ही कल्पनाच किती भयानक आहे. बिचाऱ्या पृथ्वीची जमीन म्हणजे नुसता तापलेला तवा असायची त्याकाळी! त्याकाळातली लोकं नेहमी उन्हाच्या तापाने कावलेली असायची. कधी म्हणून थंडी नाही, जरा म्हणून रात्र नाही, आकाशात गुलाबी रंगाची जराही निशाणी नाही. अगदी तप्त आयुष्य!!

त्यावेळच्या लोकांच्या असंख्य देवांपैकी, काही देवांना ह्या लोकांच्या त्रासाची काही कल्पनाच नव्हती. का तर,त्यांचं घर उंच आकाशात, ह्या सगळ्या सूर्यांच्या पलीकडे होतं ना!! त्यांना माणसांच्या दुःखाची गंधवार्ताही नव्हती. पण माणसांवर कृपादृष्टी करणाऱ्या देवांना मात्र बिचाऱ्या जनतेची कणव वाटे. ह्या सगळ्या सूर्यांना आकाशातून हटवून पृथ्वीचा आणि माणसांचा ताप कसा कमी करायचा ह्यावर त्यांनी बराच विचार केला, पण उपाय सापडेना. शेवटी त्यांतला एक छोटूला देव म्हणाला, "आपण माणसाला विचार करण्याची अक्कल दिली आहे, मग त्यांनाच विचार करायला लावू आणि जो माणूस छानदार उपाय करेल त्याला एक गंम्माडी जंम्माडी सिद्धी बक्षीस म्हणून देऊ. नाहीतरी माणसांना स्पर्धा आवडतेच!" सगळ्या देवांना ही कल्पना आवडली.

मग काय विचारता? खाली पृथ्वीवर सगळ्या शहाण्या सुरत्या माणसांनी त्यांची टकली,डोकी खाजवली, बोचऱ्या दाढ्या कुरवाळल्या आणि आपल्या भारी भारी मेंदूना झिणझिण्या येईपर्यंत विचार केले, चर्चा केली...पण अंहं! उपाय मिळेल तर शपथ!!

काही शूर योद्धे उठले; थेट सूर्यांबरोबर युद्ध पुकारण्यासाठी त्यांनी शंख  फुंकले. पण सगळ्या सूर्यांनी त्यांच्या शंखनादाकडे थेट दुर्लक्ष केलं आणि आपले आकाशात तळपत राहिले. ह्या सगळ्यांमध्ये 'हौयी' नावाचा एक भला शहाणा आणि महाशूर असा सरदार होता. त्याची अक्कल आणि बाण इतके भारी काम करायचे की सगळे त्याला तळपत्या सूर्याचीच उपमा द्यायचे. तर आपले हौयी साहेब; त्यांनी शक्कल लढवली. दहापैकी नऊ सूर्यांना अचूक नेम धरून बाणाने लांब हाकून द्यायची योजना बनविली.

आता सूर्यांना हकलायचं म्हणजे भले मोठ्ठे धनुष्य आणि अगदी टोकदार बाण हवेत.   असलं आयुध बनवण्यासाठी अगदी भारीतले बांबू आणि लवचिक वेत हवेत. हौयी अशा बांबूच्या अन वेताच्या शोधात अख्ख्या चीनभर हिंडले. मग मनासारखा कच्चा माल घेऊन धनुष्यबाण बनविले. ते धनुष्य इतकं मोठं होतं की ते फक्त उचलायला दोनशे माणसं लागायची आणि ते बाण वाहण्याकरिता अजून दोनशे माणसं. आता सूर्यांवर नेम धरण्यासाठी सगळ्यात उंच पर्वतशिखरावर सरदारसाहेब आपल्या हजार लोकांच्या ताफ्यासह निघाले. ताफ्यातील लोकांनी धनुष्य आणि बाण वर उचलून आणले. त्या धनुष्याची प्रत्यंचा शंभर लोकांनी मिळून बांधली. मग पन्नास लोकांनी बाण चढवला. हौयी ने नीट नेम धरून पहिल्या सूर्यावर बाण सोडला... आणि व्हूस्स! बाणाने सूर्याला खूप लांब ढकलून दिलं. इतकं लांब की आता तो पृथ्वीच्या सर्वात उंच पर्वतावरून दिसतही नव्हता. सरदारसाहेबांचे  ताफ्यातील लोक इतके दमले की त्यांना आराम करायला एक आठवडा लागला. आठवड्याभराने पुन्हा हौयी साहेबानी नेम धरला. दुसऱ्या सूर्यालाही पृथ्वीच्या कक्षेतून हाकलून लावलं. मग परत आराम, परत नेम असं करत नऊ आठवड्यांत नऊ सूर्यांना कधीही न परतण्याच्या दौऱ्यावर धाडून दिलं.

सरतेशेवटी जेव्हा एकच सूर्य राहिला आणि पृथ्वीवर थंडावा आला, तेव्हा सारी पृथ्वी जल्लोष करू लागली. फक्त माणसं नव्हे, सगळे प्राणी, पक्षी किडे सगळेच! नद्या वाहू लागल्या; रात्र,पहाट, संध्याकाळ ,थंडी, पिकं, जंगलं, बागा अशी सगळी नवलाईची सुखं पृथ्वीवर नांदू लागली.

आता देव हौयी वर खूश झाले. देवांनी त्याला बक्षीस म्हणून एका सुरेख सुरईत एक जंम्माडी गंम्माडी पेय भरून दिलं. हे पेय जवळ जवळ अमृतासारखंच होतं म्हणे!!छोटुल्या देवानी हौयीला सांगितलं," या पेयाचा एकच थेंब दरवर्षी केवळ एकदाच प्यायचा. हा थेंब तुझं आयुष्य दहा वर्षांनी वाढवील. पण हांss , हाव करायची नाही. जास्त प्यायलास तर काहीतरी वाईट, अगदी अगदी वाईट होईल.", आता नक्की काय वाईट होणार ते मात्र त्यांनी आपल्या सरदाराला सांगितलं नाही.

सरदार साहेब ही सुराई घेऊन मोठ्या खुशीत घरी आले. त्यांनी आपल्या बायकोला 'चँग एर'ला सगळी हकीकत ऐकवली. छोटुल्या देवाचा अति हाव न करण्याचा धोक्याचा इशाराही पुनःपुन्हा समजावून सांगितला. मग दोघांनीही त्या पेयचा एक एक थेंब प्यायला. पुढच्या वर्षी पिण्याकरिता म्हणून हौयीने ती सुराई जपून आपल्या तिजोरीत ठेवली, कडी कोयांड्याने तिजोरी बंद केली आणि किल्ली आपल्या कमरपट्ट्यात जपून ठेवली.इकडे चँग एरला उत्सुकता गप्प बसू देईना. तिला वाटले, 'काय होईल जास्त पेय प्यायलं तर? त्याची चव इतकी अनोखी आहे की बस्स. अशा चवीचं पेय काही वाईट करू शकत नाही, काही करून,थोडं जास्त पिऊन बघावंच म्हणजे झालं.'

तिनं शक्कल लढवली. सरदारसाहेबांना म्हणाली, "देवांनी तुम्हाला एवढं मोठं यश दिलं, इतकं छान बक्षीस दिलं, तर आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. तुमच्यामुळे रात्र आणि चंद्र तयार झाला त्याप्रीत्यर्थ मी चांधीरडी म्हणजे चंद्रासारखी दिसणारी धिरडी बनवणार आहे आणि ती देवांना अर्पण करणार आहे. पण त्याकरता मला काही दुर्मिळ पदार्थ लागतील. तुम्ही द्याल का आणून?",  बाहेर अगदी हुश्शार असलेला हौयी, ह्या बोलण्याला चटकन फसला. तो कपडे बदलत असताना, चँग एरने त्याच्या पट्ट्यातील किल्ली चोरली. हौयी लगेच बायकोकडून यादी घेतली आणि समान आणायला निघाला, आपला ताफा घेऊन. त्याची पाठ वळताक्षणी, चँग एर तिजोरीकडे धावली, कुलूप उघडलं आणि सुराई काढली. एक मोठ्ठा घोट घेतला...आहाहाsss मस्त चव!!.  तिने समोरच्याच आरश्यात पाहिलं. ती इतकी तरुण दिसत होती, तिची त्वचा इतकी चमकदार झाली होती, तिला इतकं हलकं वाटत होतं की बस्स. 'छे, ह्या पेयाने काही वाईट होऊच शकत नाही. देवांनी आपल्या भाबड्या नवऱ्याला फसवलंच. हौयी त्यांच्याइतका शक्तिशाली होऊ नये म्हणूनच त्यांनी ही बनावट गोष्ट रचली असावी. अजून थोडं प्यावं झालं.' मग तिनं अजून एक घोट घेतला. 'हलकं अगदी हलकं वाटतंय. मस्त नाचावं वाटतंय. ला ला ला'   गाणं गुणगुणत तिने आपली नाचरी पावलं हलवली. इतकं छान तिला जन्मात नाचता आलं नव्हतं. 'हौयीनं मला पाहिलं ना, परत प्रेमात पडेल माझ्या' अजून अजून करत ती बरंच पेय प्यायली. ओहोहो... ती इतकी हलकी झाली की ती आता तरंगत होती, तिला वजन असं नव्हतंच. हो, ती वाऱ्यावर स्वर होऊन उडू शकत होती. 

तरंगत तरंगत ती खिडकीतून बाहेर उडाली, वाड्यावरून, उंच झाडांवरून अगदी उंच उडणाऱ्या घारींच्याही वरून ती तरंगत चालली होती. खाली बघितला, तो सगळ्यात उंच पर्वत...कित्ती छोटा दिसत होता. माणसं तर मुंगीसारखी वाटत होती. 'मज्जा आली. चला आता परतून घरी जाऊ.'  तिनं पाय हलवले, हात हलवले, माना वेळावल्या, अगदी लाथा झाडल्या गाढवासारख्या; पण रामा शिवा गोविंदा...खाली जाताच येईना! ती आपली वर वर वरच चालली होती.

इकडे सरदार हौयी सगळं समान घेऊन चविष्ट चांधीरडी खाण्याचे बेत आखत घरी आले. पण घरी त्यांची चँग नव्हतीच मुळी. गेली कुठे? घरभर पाहिलं आणि उघडी तिजोरी आणि अर्धी रिकामी सुराई दिसल्यावर त्यांच्या लक्षात सगळा प्रकार आला. बिचारे रडूच लागले. चँग एरचं काय झालं असावं या विचारातून!!

चँग एर बाई आपल्या उडतच होत्या... उंच, अजून उंच. 'देवा हे थांबणार तरी कधी? आणि कुठे?' धाडssss! 
चँग एर चंद्रावर जोरदार धडकल्या. उठायला जाता धडपडल्या.

तेवढ्यात तिकडे छोटूला देव आला. चँग एरनं त्याची माफी मागितली; पण तिला परत नेणं त्याच्या हातात नव्हतंच. तेव्हापासून चँग एर चंद्रावरच राहते. देवांकरिता चांधीरडी बनवते आणि देवही तिच्याकडं मधून मधून जाऊन पुख्खा झोडून येतात.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी

सूर्य आणि चंद्र

🔶गोष्टीचे नाव-सूर्य आणि चंद्र

🔶अनुवादक-डॉ.अर्चना चव्हाण

🔶मूळ स्रोत-नायजेरियन कथा

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही!

सूर्य आणि पाणी हे एकमेकांचे खूप खास मित्र होते.ते दोघे ही पृथ्वीवर रहात.सूर्य खूपदा पाण्याला भेटायला त्याच्या घरी जाई .पाणी मात्र सूर्याच्या घरी कधीही आलं नव्हतं.

खूप दिवस गेल्यानंतर एके दिवशी सूर्याने पाण्याला विचारलं, "मित्रा,मी कित्तीतरी वेळा तुझ्या घरी तुला भेटायला आलो आहे.तू का बरं मला भेटायला येत नाहीस माझ्या घरी?"

पाणी त्याला म्हणालं,"अरे मित्रा ,तुझं घर केवढं लहान ,मी आणि माझी माणसे खूप आहेत.तुझ्या एवढयाशा घरात ती कशी मावतील?ती आली तर तुला जागा रहाणार नाही."पुढं पाणी म्हणालं,"ऐक,तुझी अशी इच्छाच आहे ना मी यावं, तर तुला मला आणि माझ्या लोकांसाठी  तुझ्या घराभोवती कुंपण किंवा भिंत बांधावी लागेल.आम्हाला खूप मोठी जागा लागेल."

सूर्याला खूप आनन्द झाला.त्याने पाण्याला वचन दिलं आणि तो घरी परतला.घरी आल्यावर त्याची पत्नी चंद्र  हिने त्याचं हसतमुखाने स्वागत केलं. सूर्याने पाण्याबरोबर झालेला वार्तालाप तिला सांगितला.

दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या मित्राच्या अगत्यासाठी मोठ्ठं कुंपण बांधायला सुरवात केली.जेव्हा कुंपण बांधून झालं तेव्हा त्याने पाण्याला दुसऱ्या दिवशी आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं.

दुसऱ्या दिवशी पाणी आपल्या माणसांसोबत त्याच्या घरी पोहोचलं. त्याने सूर्याला ,"मी आत येऊ ना ,आम्ही सर्व राहू ना एवढया जागेत?" असं बाहेरूनच विचारलं.
सूर्य म्हणाला,"मित्रा,नि:शंक ये."

पाणी आपल्या मासे आणि इतर जलचरांबरोबर आत येऊ लागलं.लवकरच जेव्हा गुडघाभर पाणी झालं तेव्हा त्याने पुन्हा सूर्याला विचारलं की त्याने आणि त्याच्या माणसांनी आत येणं सुरक्षित आहे ना! सूर्याने  खात्री दिल्यावर खूप साऱ्या जलचरांबरोबर अजून पाणी आत येऊ लागलं .

थोड्याच वेळात पाणी एक माणूसभर उंचीपर्यंत पोहोचलं .तेव्हा पाण्याने पुन्हा सूर्याला विचारलं, "येऊ ना आत?"सूर्याने अर्थात हो म्हटलं .पाणी आपल्या लोकांसोबत आत येऊ लागलं .त्यांचा रेटा एवढा होता की पाणी छतापर्यंत पोहोचलं आणि चंद्र सूर्याला घराच्या छतावर जाऊन रहावं लागलं.

थोड्या वेळाने ,जेव्हा पाण्याने परत विचारलं अजून जलचर आत येण्याबद्दल ,तेव्हा सूर्य आणि चंद्र ह्यांनी त्याला आत येण्यास सांगितलं. पाणी आणि त्याचे जलचर सर्व आत येऊ लागले ,तेव्हा सूर्य  आणि चंद्राला ह्यांना जागेवर उभं रहायला जागाच नव्हती ,ते छताकडे होते आणि शेवटचा पाण्याचा रेटा एवढा होता की त्यांना छताच्याही वर ,आकाशात जावं लागलं.

तेव्हापासून मित्रांनो,सूर्य आणि चंद्र  दोघेही आकाशात रहातात.

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी

Tuesday, March 5, 2019

राजकुमार सहृद

🔶गोष्टीचे नाव-राजकुमार सहृद

🔶अनुवादक-डॉ.निखिल पाठक

🔶मूळ स्रोत-युरोपियन कथा

कोणे एके काळी एक राजा होऊन गेला. त्याच्या एकुलत्या एक राजपुत्राचे नाव होते सुहृदय.वयाची २० वर्षे पूर्ण झालीत, तेव्हा राजपुत्र सुहृदने आपल्या वडिलांकडे देशाटनास जाण्यासाठी अनुमती मागितली.त्याच्या वडिलांनी त्याला प्रवासासाठी आवश्यक ती सामुग्री दिली आणि त्याच्या रक्षणासाठी एक प्रामाणिक सेवक देऊन आपले आशीर्वाद दिले.आपल्या वडिलांचा निरोप घेऊन राजपुत्राने एका उमद्या घोड्यावरून प्रस्थान ठेवले आणि नवनवीन गोष्टी शिकत, अधिक समंजस व उत्तम पुरुष म्हणून परतण्यासाठी तो रचयित्याने निर्मिलेले जग पाहत राज्यामागून राज्ये पालथी घालू लागला.

असाच एकदा जेव्हा तो राजपुत्र एका शांत अशा कुरणातून सावकाश मार्गक्रमण करत होता, त्यावेळी अचानक त्याला एक गरुड एका हंसाचा पाठलाग करीत असल्याचे दिसले.
तो धवल हंसपक्षी त्या गरुडाच्या तीक्ष्ण नख्यांच्या तावडीत सापडणार तोच, राजपुत्र सुहृदने काळजीपूर्वक नेम धरुन बंदुकीतून बार काढला. गरूडाचे प्राणोत्क्रमण होऊन तो कोसळला, तसा आनंदित झालेला हंसपक्षी खाली उतरून म्हणाला, " हे राजपुत्र सुहृद, तू मदत केलीस त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. तुझे आभार मानणारी मी कुणी हंसपक्षी नसून राजा अदृश्यमान याची जादुई कन्या आहे. आणि तू मला कुण्या गरुडाच्या नव्हे, तर अत्यंत दुष्ट अशा जादूगार राजा कोश्चे याच्या तावडीतून जीवनदान दिले आहे.
या अडचणीच्या वेळी तू केलेल्या मदतीचे सुयोग्य प्रतिफल माझे वडील तुला देतील. लक्षात ठेव, तुला जेव्हा कधी गरज असेल, तेव्हा, 'हे शिलेदार अदृश्यमान, माझी मदत करा' असे तीन वेळा म्हण." अशा प्रकारे आपले बोलणे पूर्ण करून तो हंसपक्षी लगेचच उडून गेला. राजपुत्र सुहृदने ते लक्षपूर्वक पाहिले आणि त्यानंतर त्याने पुन्हा आपला प्रवास सुरू केला.

त्याने अनेक पर्वत लांघले, कित्येक खोल नद्या पार केल्या आणि देशही पालथे घातले. सरतेशेवटी तो एका प्रचंड वाळवंटापाशी पोचला, जिथे वाळू आणि आकाश याशिवाय काहीही दिसत नव्हते.तिथे ना कुणी मनुष्य राहत होता, ना कुठल्या प्राण्याचा आवाज कधी ऐकू आला ना तिथे कधी कुठली वनस्पती उगवली; सूर्य इतक्या प्रखरतेने तेजाळत होता की त्या भयंकर दाहाने तिथल्या सगळ्या नद्या आटून गेल्या होत्या, त्यांचे किनारे वाळूत हरवून गेले होते आणि तिथे कुठेही पाण्याचा एक थेंबही नव्हता. सगळीकडे जाण्यासाठी आणि सगळं काही पाहण्यासाठी अधीर असलेल्या राजपुत्राच्या ध्यानात तिथला कोरडेपणा काही आला नाही आणि तो वाळवंटात आणखीनच पुढे व खूप खोलवर जात राहिला.मात्र थोड्याच वेळात त्याला प्रचंड तहान लागली. त्यामुळे पाणी शोधण्यासाठी त्याने आपल्या सेवकाला एका दिशेला पाठवले व तो स्वतः दुसऱ्या दिशेला पाणी शोधत फिरू लागला.

खूप वेळानंतर एक विहीर शोधण्यात तो यशस्वी झाला आणि सेवकाला बोलावून म्हणाला की, "थोडे पाणी मिळू शकेल असा एक मार्ग मला सापडलाय." यावर ते दोघेही आनंदित झाले.मात्र त्यांचा आनंद फार काळ काही टिकला नाही, कारण ती विहीर खूप खोल होती आणि पाण्यापर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्याकडे काहीही साधन नव्हते.
तेव्हा राजपुत्र सेवकास म्हणाला," घोड्यावरून खाली उतर. एखाद्या लांब दोराच्या साहाय्याने मी तुला विहिरीत उतरवतो. तू थोडे पाणी घेऊन वर ये." "नाही राजकुमार," तो सेवक राजपुत्राला म्हणाला, " मी आपल्याहून अधिक वजनदार आहे आणि आपले हात मला धरून ठेवू शकणार नाहीत. त्याऐवजी, मी दोर धरतो आणि आपल्याला विहिरीत उतरवतो." राजपुत्राने स्वतःला दोर बांधला आणि विहिरीत खाली उतरला. थंडगार पाणी प्यायल्यावर त्याने सेवकासाठी थोडे पाणी घेतले आणि स्वतःला वर खेचण्यासाठी त्याने दोराला हिसका देऊन सेवकाला इशारा दिला.

पण त्याला वर खेचण्याऐवजी तो सेवक म्हणाला, "ऐक राजकुमारा! रांगत्या वयापासून आजतागायत तू भोगविलास आणि प्रेमाने समृद्ध असे आनंदी जीवन जगला आहेस आणि मी कायमच अतिशय दुःखद व दुर्दैवी जीवनाला सामोरे गेलोय.आता तू माझा सेवक होण्यास राजी हो आणि तुझ्याजागी मी राजकुमार म्हणून राहीन. ही अदलाबदली तुला अमान्य असेल, तर शेवटचा धावा सुरु कर, कारण मग मी तुला इथेच बुडवेन." "माझ्या एकनिष्ठ सेवका, मला बुडवू नकोस. माझ्यासारखा चांगल्या स्वभावाचा स्वामी तुला खरोखर मिळणार नाही आणि बाहेरच्या जगात खुनी माणसाला काय मिळू शकते हे तुला ठाऊक आहे."
"बाह्य जगात माझ्या वाट्याला जे येईल ते भोगेन मी, पण या इथे मी तुला मात्र नक्कीच सोसायला लावेन." आणि असे म्हणून त्या सेवकाने दोर सावकाश खाली सोडण्यास सुरुवात केली. "थांब!" मोठ्याने ओरडत राजकुमार उद्गारला, " यापुढे मी तुझा सेवक असेन आणि तू माझा स्वामी. मी तुला माझा शब्द देतो." " माझा तुझ्या शब्दावर विश्वास नाही. शपथ घे की मला जे काही वचन तू दिलेयस, ते तू लिहून देशील. कारण बोललेले शब्द वाऱ्यावर विरून जातात, मात्र लिहिलेले शब्द कायम साक्ष म्हणून उरतात."

" मी शपथ घेतो!"

सेवकाने एक कागदाचा तुकडा आणि लेखणी खाली विहिरीत टाकली आणि राजकुमाराला त्यावर पुढील मजकूर लिहावयास सांगितला. " हे पत्रक बाळगणारा व्यक्ती हा राजकुमार सुहृद असून, तो आपल्या वडिलांच्या राज्यातील प्रजाजन असलेल्या आपल्या सेवकासोबत प्रवास करीत आहे." सेवकाने त्या कागदावरून दृष्टी फिरवली, राजकुमाराला विहिरीतून बाहेर काढले, त्याला स्वतःचे फाटके कपडे देऊन आणि स्वतः राजकुमाराचे उंची वस्त्रे परिधान केले. त्यानंतर चिलखत व घोड्यांची अदलाबदल करून, ते पुढे निघाले.

साधारण आठवडाभरात ते एक राज्याच्या राजधानीत पोहचले. जेव्हा ते राजवाड्यापाशी पोहचले, तेव्हा खोट्या राजकुमाराने खोट्या सेवकास आपला घोडा देऊन तबेल्यात जाण्यास सांगितले आणि तो स्वतः थेट राजदरबारात गेला व राजाला म्हणाला : "जिचे सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या चर्चा सर्वदूर सुरू आहेत अशा तुझ्या कन्येचा हात मागण्यासाठी मी आलो आहे. तुला मान्य असेल, तर तुझ्यावर आमचा लोभ कायम राहील. अन्यथा याचा निर्णय युद्धाने केला जाईल."
"तू माझ्याशी बोलताना वापरलेली भाषा ही मुळीच योग्य नव्हती, एखाद्या राजकुमाराला शोभेल अशी तर नक्कीच नाही, पण कदाचित असेही असू शकेल की तुमच्या राज्यात तुम्हाला याहून चांगल्या शिष्टाचाराची सवय नसेल.

आता माझे बोलणे ऐक, माझ्या भावी जावयाला. माझे राज्य आता शत्रूच्या हाती सापडले आहे. त्याच्या सैनिकांनी माझ्या सर्वोत्तम योद्ध्यांना बंदी केले आहे आणि आता ते माझ्या राजधानीवर चाल करून येत आहेत. जर तू माझे राज्य या सैनिकांच्या तावडीतून सोडवलेस,  तर बक्षीस म्हणून मी राजकन्येचा हात तुझ्या हाती देईन." "ठीक आहे", खोटा राजकुमार उत्तरला, " मी तुझ्या शत्रूंना पळवून लावेन. ते राजधानीवर चालून येतील याची चिंता करू नकोच. उद्या सकाळी तुझ्या राज्यात एकही शत्रू शिल्लक नसेल."

सायंकाळी तो राजवाड्याबाहेर पडला आणि आपल्या सेवकास बोलावून म्हणाला, " ऐक माझ्या प्रिय सेवका! शहराच्या तटबंदीच्या बाहेर जाऊन शत्रूसैनिकांच्या सगळ्या तुकड्या पळवून लाव. या सेवेच्या मोबदल्यात मी तुला तो कागद परत करेन, ज्यानुसार तू तुझे राज्य नाकारून माझा सेवक होण्याची शपथ घेतलीस." त्या प्रामाणिक राजकुमार सुहृदने आपले सरदाराला शोभेल असे चिलखत धारण केले, आपल्या घोड्यावर बसून तटबंदीच्या बाहेर आला आणि त्याने मोठ्याने आवाज दिला, "हे शिलेदार अदृश्यमान! माझ्या मदतीसाठी ये!" "मी आलोय," शिलेदार अदृश्यमान म्हणाला, " मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? मी तुझ्यासाठी सर्वकाही करण्यास तयार आहे, कारण तू माझ्या मुलीचे त्या भयंकर कोश्चेपासून रक्षण केलेस."

राजकुमार सुहृद ने त्याला सैन्य दाखवले. त्याचबरोबर शिलेदाए अदृश्यमानने जोराने शीळ वाजवली व म्हणाला, " अरे, माझ्या चतुर घोड्या, ताबडतोब माझ्यापाशी ये."
मग हवा सळसळली, गडगडाट होऊन धरती हादरली आणि एक अद्भुत घोडा अवतरला. त्याची आयाळ सोनेरी होती. त्याच्या नाकातून पेटत्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्याच्या डोळ्यातून तेजस्वी ठिणग्या उडत होत्या आणि कानातून धूराचे दाट लोट बाहेर येत होते. शिलेदार अदृश्यमान उडी मारू घोड्यावर बसला आणि राजकुमाराला म्हणाला, " ही जादुई तलवार घेऊन तू सैन्यावर डावीकडून हल्ला कर आणि मी माझ्या सोनेरी आयाळ असलेल्या घोड्यावर बसून उजवीकडून त्यांच्यावर तुटून पडतो."

त्या दोघांनी त्या सैन्यावर आक्रमण केले. डावीकडून सैनिक झाड पडावे तसे पडत होते, तर उजवीकडून जणु जंगलच्या जंगलच एकदम कोसळावे, तसे कोसळत होते.
घटकाभरातच संपूर्ण सैन्य नष्ट झाले. जे मेले, ते तिथेच पडून होते, बाकीचे उरलेले पळून गेले. राजकुमार सुहृद आणि शिलेदार अदृश्यमान रणांगणावर भेटले, मित्रत्वाने त्यांनी हस्तांदोलन केले आणि पळवतात शिलेदार अदृश्यमान आणि त्याचा घोडा एका तेजस्वी लाल ज्वाळेत रूपांतरित झाले आणि दाट धूरात परिवर्तित होऊन काळोखात नाहीसे झाले. त्यानंतर राजकुमार सुहृद शांतपणे राजवाड्यात परतला.

तरुण राजकुमारी त्या सायंकाळी खूप दुःखी होती. ती झोपू शकत नव्हती. त्यामुळे ती खिडकीत झुकून बसली होती, जिथून तिला राजकुमार व त्याच्या सेवकाचे बोलणे सहजच ऐकू आले. त्यानंतर, तटबंदीपलिकडे काय सुरू होते, ते पण तिने पाहिले. शिलेदार अदृश्यमानला काळोखात नाहीसे होताना आणि राजकुमाराला सुहृद ला राजवाड्याकडे परत येताना देखील तिने पाहिले. तिने पाहिले की खोटा राजकुमार राजवाड्याबाहेर आला, त्याने सेवकाकडून चिलखत घेतले आणि मग राजकुमार सुहृद विश्रांतीसाठी तबेल्यात गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आपले राज्य शत्रूपासून मुक्त झाल्याचे पाहून तो वृद्ध राजा अतिशय आनंदित झाला आणि त्याने राजकुमाराला भरपूर उंची भेटवस्तू दिल्या. मात्र जेव्हा त्याने राजकुमारासोबत आपल्या मुलीच्या वाङनिश्चयाची घोषणा केली, तेव्हा राजकुमारी जागेवरून उठली आणि त्यावेळी अन्न वाढण्यात मदत करत असलेल्या खऱ्या राजकुमाराच्या हाताला धरून त्याला वृद्ध राजासमोर आणून ती म्हणाली , "माझे प्राणप्रिय पिता व राजा, आणि इथे उपस्थित असलेले सर्वजण! हा मनुष्य माझा वर अाहे, जो खरा राजकुमार आहे आणि तुमचा रक्षणकर्ता, ज्याला जणु काही देवानेच पाठवले आहे. आणि स्वतःला राजकुमार म्हणवून घेणारा हा माणूस विश्वासघातकी, खोटारडा आणि अप्रामाणिक आहे." मग तिला माहीत असलेले सर्व काही सांगून राजकुमारी म्हणाली, " तो खरोखर राजकुमार असल्याचा पुरावा त्याला दाखवू द्या."

खोट्या राजकुमाराने तो कागद राजाला दिला, जो त्याला विहिरीत असताना दिला गेला होता. राजाने तो उघडला आणि मोठ्या आवाजात वाचू लागला, " हे पत्रक धारण करणारा, राजकुमार सुहृद याचा खोटारडा व बनावट सेवक, क्षमा मागतो आणि न्याय्य शिक्षा मिळावी अशी याचना करतो. हे पत्रक त्याला राजकुमार सुहृदने विहिरीत असताना दिले आहे." " काय हे खरोखर असे आहे?" असे तो दुर्दैवी सेवक मोठ्याने ओरडला आणि तो मृतवत फिका पडला.
" होय, तुझा विश्वास नसेल तर तू स्वतः हे वाच." राजा उद्गारला. " मला वाचता येत नाही." तो बिचारा सेवक म्हणाला. त्याने आपल्या मालकासमोर गुडघे टेकले आणि दयेची भीक मागितली. मात्र त्याला मिळायला हवे होते तेच मिळाले."

राजकुमार सुहृद आणि राजकुमारीचा विवाह आनंदाने संपन्न झाला, मी पण त्या सोहळ्याला उपस्थित होतो आणि मलाही खूप आनंद झाला.

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी