🔶गोष्टीचे नाव-कथा टॉमीच्या नाकाची
🔶अनुवादक-डॉ. वृषाली देहाडराय
🔶मूळ स्रोत-डॅनिश कथा
कप्तान हमिल्टनबरोबर केलेल्या जलप्रवासात मी माझ्या आवडत्या शिकारी कुत्र्याला बरोबर घेतले होते. सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर तो माझ्यासाठी मौल्यवान होता. अगदी त्याच्या वजनाएवढ्या सोन्याच्या किंमतीइतकाच. कारण आत्तापर्यंत त्याने त्याच्यावर असलेल्या माझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला नव्हता. एके दिवशी जेव्हा आम्ही किनाऱ्यापासून अंदाजे तीनशे लीग अंतरावर होतो तेव्हा तो एकाएकी ठराविक दिशेकडे बघून भुंकू लागला. मी आश्चर्याने जवळजवळ तासभर त्याचे निरीक्षण करत होतो. ही घटना मी कप्तानाला आणि डेकवरच्या प्रत्येक अधिकाऱ्याला सांगितली. मी त्यांना म्हटले की आपण जमिनीच्या जवळपास आहोत कारण माझ्या कुत्र्याला शिकारीचा वास लागला आहे. या माझ्या सांगण्यावर एक सार्वत्रिक हशा निर्माण झाला. पण त्यामुळे माझे माझ्या कुत्र्याबाबतचे मत यत्किंचीतही बदलले नाही. यावर बरीच भवतीनभवती होऊनही मी कप्तानाला धाडसाने सांगितले की जहाजावरच्या कोणत्याही खलाशाच्या डोळ्यापेक्षा माझ्या कुत्र्याच्या नाकावर जास्त भरवसा आहे.
आता आपल्याला अर्ध्या तासाच्या आत जमीन सापडेल असे सांगून म्हणून माझ्या प्रवासाचा मोबदला म्हणून जी शंभर नाणी द्यायची कबूल केली होती ती त्याच्यापुढे पैज म्हणून ठेवली. कप्तान मोठा उमदा माणूस होता. तो परत हसला आणि जहाजावरच्या डॉक्टरला माझी नाडी बघायला सांगितली. त्याने मला तपासले आणि माझी प्रकृती ठणठणीत असल्याला निर्वाळा दिला. ते दोघे जरी आपापसात हळू बोलत होते तरी ते माझ्या कानावर पडले. त्यांच्यामध्ये जे संभाषण झाले ते काहीसे असे होते-
कप्तान – त्याचे डोके फिरले आहे. त्याच्या या अशा अवस्थेमध्ये मी त्याच्याबरोबर पैज लावू शकत नाही.
डॉक्टर – माझे मत वेगळे आहे. त्याचे डोके पूर्णपणे ठिकाणावर आहे. जहाजावरच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या मतापेक्षा त्याचा त्याच्या कुत्र्याच्या वास ओळखण्याच्या क्षमतेवर जास्त विश्वास आहे. तो ही पैज नक्कीच हरणार आहे.
कप्तान- ही पैज माझ्या बाजूने न्याय्य ठरणार नाही. तरीसुद्धा मी ही पैज लावणार आहे. पण नंतर मी त्याचे पैसे परत करेन.
हे संभाषण चालू असताना माझा कुत्रा टॉमी सतत त्याच दिशेने बघत होता. त्यामुळे माझे मत आणखीनच पक्के झाले. मी पुन्हा एकदा पैज लावण्याचे आव्हान केले आणि यावेळी ते कप्तानाने स्वीकारले.
‘लागली तर पैज’ असे आम्ही जेमतेम म्हणतच होतो तेवढ्यात होडक्यात बसून मासेमारी करणाऱ्या खलाशांनी एक मोठा शार्क मासा भाल्यांनी मारला. तो मासा त्यांनी जहाजाच्या डेकवर आणला आणि त्यातून निघणारी चरबी पिंपांमध्ये भरून ठेवण्यासाठी तो मासा ते कापू लागले. आणि अहो आश्चर्यं! त्याच्या पोटातून थोडी थोडकी नाही तर सहा जिवंत तितरं निघाली. ती तितरं त्या स्थितीमध्ये एवढा वेळ होती की एक मादी चार अंडी उबवत बसलेली दिसली आणि शार्कला फाडून उघडला तेव्हा पाचव्या अंड्यातून पिल्लू बाहेर येत होत.
या तितराच्या पिल्लाला आम्ही नुकत्याच जन्मलेल्या मांजरीच्या पिल्लांमध्ये सोडले. त्या मांजरीला तिच्या चार पायांच्या पिल्लांएवढाच या पंखवाल्या पिल्लाचा लळा लागला. आणि गम्मत म्हणजे जेव्हा हे पिल्लू जेव्हा तिच्या कुशीतून उडून लांब गेले तेव्हा ते परत येईपर्यंत तिला अजिबात चैन नव्हते. शार्कच्या पोटात आणखी चार तितरांच्या माद्या होत्या ज्या आळीपाळीने अंडी देत होत्या. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण प्रवासात कप्तानाच्या टेबलावर सतत चटकदार मांसाहारी पदार्थ येतच राहिले. शंभर नाणी जिंकून दिल्याच्या उपकारापोटी मी टॉमीला दररोज हाडकं चघळायला देत होतो आणि कधीकधी संपूर्ण पक्षीसुद्द्धा.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी
No comments:
Post a Comment