🔶गोष्टीचे नाव-सूर्य आणि चंद्र
🔶अनुवादक-डॉ.अर्चना चव्हाण
🔶मूळ स्रोत-नायजेरियन कथा
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही!
सूर्य आणि पाणी हे एकमेकांचे खूप खास मित्र होते.ते दोघे ही पृथ्वीवर रहात.सूर्य खूपदा पाण्याला भेटायला त्याच्या घरी जाई .पाणी मात्र सूर्याच्या घरी कधीही आलं नव्हतं.
खूप दिवस गेल्यानंतर एके दिवशी सूर्याने पाण्याला विचारलं, "मित्रा,मी कित्तीतरी वेळा तुझ्या घरी तुला भेटायला आलो आहे.तू का बरं मला भेटायला येत नाहीस माझ्या घरी?"
पाणी त्याला म्हणालं,"अरे मित्रा ,तुझं घर केवढं लहान ,मी आणि माझी माणसे खूप आहेत.तुझ्या एवढयाशा घरात ती कशी मावतील?ती आली तर तुला जागा रहाणार नाही."पुढं पाणी म्हणालं,"ऐक,तुझी अशी इच्छाच आहे ना मी यावं, तर तुला मला आणि माझ्या लोकांसाठी तुझ्या घराभोवती कुंपण किंवा भिंत बांधावी लागेल.आम्हाला खूप मोठी जागा लागेल."
सूर्याला खूप आनन्द झाला.त्याने पाण्याला वचन दिलं आणि तो घरी परतला.घरी आल्यावर त्याची पत्नी चंद्र हिने त्याचं हसतमुखाने स्वागत केलं. सूर्याने पाण्याबरोबर झालेला वार्तालाप तिला सांगितला.
दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या मित्राच्या अगत्यासाठी मोठ्ठं कुंपण बांधायला सुरवात केली.जेव्हा कुंपण बांधून झालं तेव्हा त्याने पाण्याला दुसऱ्या दिवशी आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं.
दुसऱ्या दिवशी पाणी आपल्या माणसांसोबत त्याच्या घरी पोहोचलं. त्याने सूर्याला ,"मी आत येऊ ना ,आम्ही सर्व राहू ना एवढया जागेत?" असं बाहेरूनच विचारलं.
सूर्य म्हणाला,"मित्रा,नि:शंक ये."
पाणी आपल्या मासे आणि इतर जलचरांबरोबर आत येऊ लागलं.लवकरच जेव्हा गुडघाभर पाणी झालं तेव्हा त्याने पुन्हा सूर्याला विचारलं की त्याने आणि त्याच्या माणसांनी आत येणं सुरक्षित आहे ना! सूर्याने खात्री दिल्यावर खूप साऱ्या जलचरांबरोबर अजून पाणी आत येऊ लागलं .
थोड्याच वेळात पाणी एक माणूसभर उंचीपर्यंत पोहोचलं .तेव्हा पाण्याने पुन्हा सूर्याला विचारलं, "येऊ ना आत?"सूर्याने अर्थात हो म्हटलं .पाणी आपल्या लोकांसोबत आत येऊ लागलं .त्यांचा रेटा एवढा होता की पाणी छतापर्यंत पोहोचलं आणि चंद्र सूर्याला घराच्या छतावर जाऊन रहावं लागलं.
थोड्या वेळाने ,जेव्हा पाण्याने परत विचारलं अजून जलचर आत येण्याबद्दल ,तेव्हा सूर्य आणि चंद्र ह्यांनी त्याला आत येण्यास सांगितलं. पाणी आणि त्याचे जलचर सर्व आत येऊ लागले ,तेव्हा सूर्य आणि चंद्राला ह्यांना जागेवर उभं रहायला जागाच नव्हती ,ते छताकडे होते आणि शेवटचा पाण्याचा रेटा एवढा होता की त्यांना छताच्याही वर ,आकाशात जावं लागलं.
तेव्हापासून मित्रांनो,सूर्य आणि चंद्र दोघेही आकाशात रहातात.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी
No comments:
Post a Comment