Wednesday, November 21, 2018

कासवाच्या पाठीवर खवले कसे आले?

🔶गोष्टीचे नाव-कासवाच्या पाठीवर खवले कसे आले?

🔶अनुवादक-दीप्ती पुजारी

🔶मूळ स्रोत-(आफ्रिकन लोककथा)

कोणे एके काळी, उंच आकाशात एका देवपुत्र आणि देवकन्येचं लग्न होतं. देवांनी पृथ्वीवरील सगळ्या प्राण्यांना लग्नाचं आमंत्रण दिले. आता ज्यांना पंख होते आणि ज्यांना उडता येत होतं त्यांचं जाणं तर निश्चित होतं; पण जे प्राणी जमिनीवरून चालायचे, सरपटायचे, उडया मारायचे नाहीतर पाण्यातून पोहायचे त्यांची भलतीच पंचाईत झाली होती. अशा प्राण्यांना उडणाऱ्या पक्ष्यांनी आपल्याला घेऊन जावे म्हणून त्यांना मस्का मारण्याशिवाय काही पर्यायच नव्हता!

तलावात पोहणाऱ्या आणि जमिनीवर सरपटत चालणाऱ्या कासवोजींच्या तोंडाला लग्नातलं मस्त जेवण हादडण्याच्या विचाराने पाणीच सुटले होते. पण जायचं कसं, ह्या समस्येने ते हैराण झाले होते. तेवढ्यात गिधाडोबा सडकी खरकटी शिकारखाणी शोधायला तलावाच्या काठावर येऊन बसले.

कासवोजींनी गिधाडाला हाक मारली," अहो गिधाडोबा, रामराम! कसे आहात?" मग अगदी मधाळ आवाजात म्हणाले, " काहो, तुम्ही देवपुत्राच्या लग्नाला जाणार आहात का उद्या?", "फूssss" तोंडातील हाड थुंकत गिधाडोबांनी मान डोलावली, "जाणार तर. अहो इतकं सुग्रास अन्न असेल तिथं, की आठवड्याभराचं एकदाच जेवेन म्हणतोय. नाहीतरी इकडं काय मिळतंय? सडकं मांस आणि वाळकी हाडं. अशी मेजवानी सोडतंय कोण? तुम्ही नाही का जाणार?"

कासवोजी अजीजीने म्हणाले, " जायची तर इच्छा खूप आहे हो, पण मला थोडंच उडता येतंय. हां, आता तुम्ही मला गरिबाला पाठीवर बसवून नेलं तर दोन घास मीही जेवेन त्या मेजवानीतलं. तेवढंच तुमच्या गाठीला पुण्य! काय म्हणता?" गिधाडोबांना कासवोजींचा कांगावा कळला. ते उत्तरले, " आता तुम्हाला न्यायचं म्हणजे पाठीचं अगदी धिरडंच व्हायचं. एवढी उस्तवारी मी का करावी हो कासवोजी? आणि पुण्याचं म्हणाल तर सगळं जंगल साफ ठेवण्याचं पुण्य करतोयच की मी रोज!" आता बाकी कासवोजींना आपला धूर्तपणा सोडून गिधाडोबांना काहीतरी द्यावं लागणार होतं.

कासवोजी आपल्या कवचाखाली रोज थोड्या थोड्या कवड्या साठवीत असत. त्यांच्याकडे चिक्कार कवड्या साठल्या होत्या. "जर तुम्ही मला पाठीवर घालून लग्नाला घेऊन गेलात तर मी तुम्हाला हज्जार कवड्या देईन!", कासवोजी म्हणाले. (त्यावेळची माणसं पैसे म्हणून कावड्यांचा वापर करायची बरं.) हा सौदा गिधाडोबांना एकदम पसंत पडला. त्यांनी कासवोजींना पाठीवरून लग्नाला नेण्याचे आणि आणायचे कबूल केलं.

दुसऱ्या दिवशी झुंजूमंजू पहाटे गिधाडोबा कासवोजींना घ्यायला आले. कासवोजींना तर मेजवानीतील चविष्ट खाऊंच्या विचारांनी झोपच आली नव्हती. ते तयार बसले होते. गिधाडोबा येताच कासवोजी पाठीवर बसले आणि दोघेही लग्नाच्या मांडवात एकदाचे पोहोचले.

लग्न लागलं आणि एकदाची लग्नातली पंगत बसली. पंगतीतलं जेवण तर फारच भारी होतं. गिधाडोबांना शेवयांची खीर फारच आवडली होती, पण त्यांच्या टोकाशी वाकड्या असलेल्या चोचीने त्यांना खिरीचा घास धड घेता येईना. गडबडीत थोडी खीर शेजारी बसलेल्या कासवोजींच्या पाठीवर सांडली आणि सगळे पक्षी कासवोजींना हसले. साहजिकच आपले कासवोजी वैतागले. ते बघून गिधाडोबांनी त्यांची समजूत काढण्यासाठी म्हटले," अहो, हवे तर मला तुमच्या कवड्या नका देऊ. पण आता मस्त जेवा पाहू." हे ऐकून चिंगूस कासवोजींना बरेच वाटले आणि ते फारच खुशीत येऊन जेऊ लागले.

जेवणं झाल्यावर सुरापानाचा कार्यक्रम सुरू झाला. आपल्या कवड्या वाचल्या म्हणून कासवोजींनी खुशीत जरा जास्तीच सुरा ढोसली. नशेत गाणे गात सुरा पीत असता ते नेमके गिधाडोबांवर धडकले आणि प्याल्यातली सगळी सुरा त्यांच्या पंखांवर सांडली. गिधाडोबा वाईट्ट तापले, पण ते भांडण्याच्या आतच कासवोजी बरळले ," ए गिधाडया, उगाच वैतागू नकोस. पंखांना लाँड्रीतून धुलाई करण्यासाठी तुला पन्नास कवड्या देईन." असलं बोलणं ऐकून गिधाडोबा अजून चिडले, आणि कासवोजींना अद्दल घडवायची असे त्यांनी ठरवले.

सगळी मेजवानी संपल्यावर, कासवोजी गिधाडोबांच्या पाठीवर बसणार तितक्यात गिधाडोबा उडत खाली निघालेसुद्धा.. कासवोजी म्हणाले,"मला घ्या ना!" गिधाडोबा उत्तरले,"कवड्यांच्या पाठीवरून जा!", आता बाकी कासवोजींची तंतरली. कुणासोबत जायचं? सगळे पक्षी कुणा न कुणाला घेऊन आले होते आणि आपल्या सोबत्यालाच ते परत नेणार होते. सगळे गेले, अगदी यजमान देव सुद्धा, आणि कासवोजी एकटेच राहिले.आता त्यांच्यापुढे दोनच पर्याय होते. एकतर तिथंच राहायचं नाहीतर उडी मारायची. पहिला पर्याय घेणं काही शक्य नव्हतं. मग त्यांनी घेतलं देवाचं नाव आणि मारली उडी याssssव!...ढप्प नेमकी पाठ आपटली दगडावर! आणि पाठीचं कवच... त्याची तर शकलं शकलं झाली.

कासवोजी तर रडूच लागले. त्यांचा आवाज ऐकून त्यांचे भाऊबंद आले. सगळ्यांनी मिळून कवचाची सगळी शकलं गोळा केली आणि सगळी ठिगळं शिवून काढली. मग असलं ठिगळंवालं कवच कासवोजींच्या पाठीला परत जोडण्यात आलं. आता कळलं ना, कासवोजींच्या पाठीवरचे खवले म्हणजे त्या ठिगळकामाच्या खुणा आहेत ते!

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी

Wednesday, November 14, 2018

सशाचे शेपूट

🔶गोष्टीचे नाव-सशाचे शेपूट

🔶अनुवादक- डॉ.वृषाली देहाडराय

🔶मूळ स्त्रोत-डॅनिश कथा

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा सशाला लांब शेपूट होते. पण मांजरीला मात्र शेपूटच नव्हते. ती सशाच्या शेपटाकडे नेहमी हेव्याने बघायची कारण तिला तसं शेपूट हवं होतं. हा ससा एक निष्काळजी आणि अविचारी प्राणी होता. एके दिवशी तो शांतपणे झोपला होता. त्याचे झुबकेदार शेपूट मागे लोंबत होते. तिथे मांजरीबाई एक धारदार सुरी घेऊन आल्या आणि त्यांनी एकाच झटक्यात सशाचे शेपूट कापून टाकले.

मांजरीबाई फारच चपळ होत्या. त्यांनी ते शेपूट त्यांच्या अंगाला जवळजवळ शिवूनच टाकले होते, तेवढ्यात ससेभाऊ जागे झाले आणि मांजरीबाई काय करताहेत हे त्यांनी पाहिले. “तुला असं नाही का वाटत की हे शेपूट तुझ्यापेक्षा माझ्या अंगावर जास्त खुलून दिसतयं?” मांजरीबाईनी विचारले. “हो. खरंच हे शेपूट माझ्यापेक्षा तुझ्या अंगावर जास्त चांगलं दिसतयं.” उदार आणि नि:स्वार्थी सशाने उत्तर दिले. “नाहीतरी ते माझ्यासाठी नको तितके लांबच होते. आणि मी आता काय करणार आहे ते तुला सांगतो. तू जर माझ्या शेपटाच्या बदल्यात तुझी धारदार सुरी मला दिलीस तर मी हे शेपूट तुझ्याकडे राहू देईन.” मांजरीने ससेभाऊंना आपली सुरी दिली आणि ती घेऊन ते घनदाट जंगलाकडे रवाना झाले.

“माझे शेपूट गेले पण मला सुरी मिळाली.” तो म्हणाला, “मला आता नवीन शेपूट मिळेल किंवा त्यासारखेच दुसरे काहीतरी छान मिळेल.” जंगलातून बराच वेळ उड्या मारत ससा पुढे चालला होता. सरतेशेवटी त्याला एक म्हातारा भेटला. तो गवताच्या टोपल्या विणत होता. टोपल्यांना लागणारे गवत तो दातांनी तोडत होता. ससा त्याच्या जवळ गेल्यावर म्हाताऱ्याने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले. त्याला दिसले की सशाच्या तोंडात सुरी होती. “अहो ससेभाऊ,” म्हातारा म्हणाला, “कृपया तुमची ती धारदार सुरी मला द्याल का? हे गवत दातांनी तोडणे खूपच अवघड पडतंय.” ससेभाऊंनी आपली सुरी त्या म्हाताऱ्याला दिली. त्याने त्या सुरीने गवत कापायला सुरुवात केली. गवत कापता-कापता सुरीचे एकदम दोन तुकडे झाले. “अरे देवा,” ससा ओरडला. “आता मी काय करू? तू माझी एवढी मस्त नवीन सुरी मोडलीस.” “माफ कर. मला वाईट वाटतंय. पण मी मुद्दामहून नाही केलं.” त्यावर ससेभाऊ म्हणाले, “या मोडक्या सुरीचा आता मला काही उपयोग नाही. ही जरी मोडकी असली तरी कदाचित तुला त्याचा उपयोग होईल. मी आता काय करणारे ते तुला सांगतो. जर तू मला सुरीच्या बदल्यात तुझी एक टोपली दिलीस तर ही सुरी मी तुला देईन.” म्हाताऱ्याने सशाला एक टोपली दिली आणि ती घेऊन तो दाट जंगलातून जाऊ लागला.

“माझे शेपूट गेले, पण मला सुरी मिळाली. माझी सुरी गेली पण मला टोपली मिळाली.” तो म्हणाला. “आता मला नवीन शेपूट किंवा त्याच्यासारखेच दुसरे काहीतरी चांगले मिळेल. ससेभाऊ टुणूक टुणूक उड्या मारत दाट जंगलातून चालले होते. शेवटी ससेभाऊ एका मोकळ्या जागेत येऊन पोचले. तिथे एक म्हातारी पालेभाजी खुडण्यात गढून गेली होती. भाजी गोळा करून ती तिच्या कपड्यांच्या ओच्यात ठेवत होती. टोपली घेउन उड्या मारत जाणाऱ्या सशाकडे तिने बारकाईने बघितले. “ओ ससेभाऊ,” ती म्हणाली, “तुम्ही कृपा करून तुमची टोपली काही वेळाकरता मला वापरायला द्याल का?” सशाने त्याची टोपली म्हातारीला दिली. म्हातारी त्या टोपलीत पालेभाजी गोळा करू लागली. तेवढ्यात टोपलीचं बूड निघून आलं. “अरे देवा,” ससा ओरडला. आता मी काय करू? तू माझ्या एवढ्या सुंदर टोपलीचं बूड मोडलंस.” म्हातारी म्हणाली, “माफ करा. मला खूप वाईट वाटतंय. पण मी मुद्दामहून नाही केलं.” तेव्हा ससेभाऊ म्हणाले, “मी आता काय करणार आहे ते तुला सांगतो. जर तू मला थोडी पालेभाजी देणार असशील तर मी ही मोडकी टोपली तुझ्याकडे राहू देईन.” त्या म्हातारीने सशाला पालेभाजी दिली आणि ती घेऊन तो उड्या मारत गेला.

ससा म्हणाला, “माझे शेपूट गेले, पण मला सुरी मिळाली. माझी सुरी गेली, पण मला टोपली मिळाली. माझी टोपली गेली, पण त्या बदल्यात मला पालेभाजी मिळाली. सशाला भूक लागली होती. पालेभाजीचा वासही छान येत होता. त्याने भाजीचा एक घास घेतला. त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच इतके चविष्ट अन्न खाल्ले होते. “माझे शेपूट गेले त्याची मला काही पर्वा नाही.” तो म्हणाला, “त्यापेक्षा जास्त आवडणारे काहीतरी मला मिळाले आहे." त्या दिवसापासून आजपर्यंत कोणत्याही सशाला शेपूट नाही.

पण आजपर्यंत कोणत्याही सशाला शेपूट नसल्याची खंत वाटलेली नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत ज्याला पालेभाजी आवडत नाही असा एकाही ससा आढळलेला नाही. सगळे ससे भरपूर पालेभाजी मिळाल्याने अगदी खूश आणि समाधानी असतात.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी

Tuesday, November 13, 2018

रात्र कशी निर्माण झाली

🔶गोष्टीचे नाव- रात्र कशी निर्माण झाली ?

🔶अनुवादक- डॉ.वृषाली देहाडराय

🔶मूळ स्रोत-डॅनिश कथा

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी हे जग नुकतेच निर्माण झाले होते. या जगामध्ये रात्रच नव्हती.पूर्ण वेळ दिवसच असायचा. कोणीही सूर्योदय किंवा सूर्यास्त, ताऱ्यांचा प्रकाश किंवा चंद्रप्रकाश याबद्दल काहीही ऐकलेले नव्हते. त्या जगात रात्रीचे पक्षी नव्हते, निशाचर प्राणी नव्हते की रात्री फुलणारी फुले नव्हती. संध्याकाळी मोठ्या होत जाणाऱ्या सावल्या नव्हत्या, रात्री मंद वाहणारा वारा नव्हता की रात्रीचा गंध नव्हता.

तेव्हा खोल समुद्रात एका सागरी महासर्प राज्य करत होता. या सागरी महासर्पाच्या मुलीने पृथ्वीवरच्या मानव वंशातील एका तरुणाशी लग्न केले. लग्न झाल्यावर खोल समुद्रातील तिचे घर सोडून ती तिच्या पतीबरोबर सदा सर्वकाळ दिवस आणि प्रखर सूर्यप्रकाश असणाऱ्या भूतलावर रहायला आली.

पण तिला एवढ्या प्रकाशाची सवय नव्हती. जमिनीवरच्या प्रखर प्रकाशाने तिचे डोळे शिणले आणि तिचे सौंदर्य झाकोळू लागले. तिची ही अवस्था बघून तिचा पती अत्यंत दु:खी झाला. तिची ही अवस्था दूर करण्यासाठी काय करावे ते त्याला कळेना. “इथे रात्र होत असती तर किती बरं झालं असतं.” अंथरुणावर तळमळत ती कण्हत म्हणाली. “इथे नेहमीच दिवस असतो. माझ्या वडिलांच्या राज्यात कितीतरी सावली असते. इथे रात्रीचा थोडा तरी अंधार असता तर किती बरं झालं असतं.” तिचा पती तिचं कण्हणं ऐकत होता. “रात्र म्हणजे काय?” त्याने तिला विचारले. “मला सांग म्हणजे मी कदाचित तुझ्याकरता थोडी रात्र आणू शकेन.”

“रात्र.” त्या सागरी महासर्पाची मुलगी म्हणाली, “समुद्राच्या पोटात खोलवर असणाऱ्या माझ्या वडिलांच्या राज्यात ज्या अंधार करणाऱ्या ज्या दाट सावल्या असतात त्याला रात्र म्हणतात. मला तुझ्या पृथ्वीवरचा सूर्यप्रकाश आवडतो पण त्यामुळे मी थकून जाते. आपल्या डोळ्यांना थोड्या वेळाकरता आराम मिळावा म्हणून माझ्या बाबांच्या राज्यातून थोडा अंधार आणता आला असता तर किती बरं झालं असतं.” तिच्या पतीने ताबडतोब त्याच्या सर्वात निष्ठावान अशा तीन सेवकांना बोलावलं. “मी आता तुम्हाला एका प्रवासाला धाडणार आहे.” तो म्हणाला. “तुम्ही खोल समुद्रात असलेल्या सागरी महासार्पाच्या राज्यात जा आणि त्यांना सांगा की त्यांची कन्या आपल्या पृथ्वीवरच्या सूर्यप्रकाशाने मरून जाऊ नये म्हणून रात्रीचा थोडा अंधार द्या.”

ते तीन सेवक सागरी महासर्पाच्या राज्यात जाण्यास निघाले. खूप धोक्याचा प्रवास करून ते अनेक दिवसांनी महासर्पाच्या राजवाड्यात पोचले. ते महासर्पाच्या समोर गेले आणि त्याला मुजरा करून उभे राहिले. “महाराज, आपल्या कन्येला पृथ्वीवरच्या प्रखर सूर्याप्रकाशाचा खूप त्रास होतोय. तेव्हा आपल्या राज्यातील रात्रीचा थोडा अंधार आम्हाला पृथ्वीवर नेण्यासाठी देण्याची कृपा करावी.” आपल्या कन्येच्या भल्यासाठी महासर्पाने त्यांची विनंती मान्य केली. त्यांनी त्याला एक गाठोडाभर अंधार दिला. त्या गाठोड्याचे तोंड गच्च बांधलेले होते. महासर्पाने त्यांना बजावून सांगितले की त्यांच्या मालकिणीच्या म्हणजे त्याच्या मुलीच्या समोर पोचल्याशिवाय ते गाठोडे अजिबात उघडायचे नाही. महासर्पाच्या राज्यातून त्या तीन सेवकांनी आपला परतीचा प्रवास सुरू केला.

त्यांच्या डोक्यावर रात्रीने भरलेले मोठे गाठोडे होते. काही काळाने त्यांना त्या गाठोड्यातून चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले. ते आवाज निशाचर प्राणी, रात्री उडणारे पक्षी आणि रातकिड्यांचे होते.

तुम्ही कधी नदीच्या काठावरच्या जंगलातले आवाज रात्रीच्या वेळी ऐकले असतील तर तुम्हाला त्या गाठोड्यातून कसले आवाज येत असतील ते समजलं असेल. त्या तीन सेवकांनी त्यांच्या आजवरच्या आयुष्यात असे आवाज पूर्वी कधीच ऐकले नव्हते. ते आवाज ऐकून ते सेवक भीतीने अगदी अर्धमेले झाले. “हे बघा, माझं ऐका. हे रात्रीने भरलेलं गाठोडं आपण इथेच टाकून देऊ या आणि इथून पळ काढूया.” एक सेवक म्हणाला. “काहीही केले तरी आपण मरणारच आहोत.” दुसरा सेवक भीतीने थरथर कापत म्हणाला. “आपण वाचू किंवा मरू. पण मी हे गाठोडे आता इथेच उघडणार आहे. हे भयानक आवाज कोण करताय ते मला बघायचाच आहे.”असं बोलून त्यांनी मग ते गाठोडे जमिनीवर ठेवले आणि उघडले. गाठोडे उघडता क्षणी ते निशाचर प्राणी, पक्षी, रातकिडे घोंगावत बाहेर आले आणि त्याचबरोबर बाहेर आला रात्रीचा एक मोठा काळा ढग. महासर्पाची राजकन्या डोळ्यात प्राण आणून रात्रीच्या अंधाराचे गाठोडे घेऊन येणाऱ्या सेवकांची वाट बघत होती. जेव्हापासून ते प्रवासाला गेले होते तेव्हापासून ती डोळ्यांवर हात ठेवून ती दूरवर क्षितिजाकडे नजर लावून मोठ्या आशेने बघत होती. कधी एकदा ते सेवक अंधार घेऊन येताहेत असे तिला झालं होतं. ज्यावेळी त्या तीन सेवकांनी गाठोडं उघडल्यावर रात्रीने पळ काढला त्यावेळी ती तशीच डोळ्यांवर हात ठेवून ती राजवाड्याच्या बागेतल्या खजुरीच्या झाडाखाली उभी होती.

“रात्र आली, अखेर रात्र आली.” जेव्हा तिला क्षितिजावर रात्रीचा अंधार दिसला तेव्हा ती आनंदाने ओरडली. मग तिने समाधानाने डोळे मिटले आणि त्या खजुरीच्या झाडाखाली झोपी गेली. झोपेतून उठल्यावर तिला अतिशय प्रसन्न वाटले. आता ती खोल समुद्रातल्या वडिलांच्या राज्यातून पृथ्वीतलावर जेव्हा ती रहायला आली तेव्हा जशी दिसत होती तशीच सुंदर आणि आनंदी दिसायला लागली. शांत झोप झाल्याने ती पुन्हा एकदा दिवसाच्या सूर्याप्रकाशाचा सामना करायला सिद्ध होती. खजुरीच्या झाड्याच्या माथ्यावर चमकणाऱ्या ताऱ्याकडे पाहून ती म्हणाली, “हे तेजस्वी ताऱ्या, तू आजपासून पहाटेचा तारा म्हणून ओळखला जाशील आणि तुला दिवसाचा दूत मानले जाईल. या प्रहरी या आकाशावर तुझे राज्य असेल.” तिने सर्व पक्ष्यांना आपल्याकडे बोलावले आणि म्हटले, “मधुर गीत गाणाऱ्या हे पक्ष्यांनो, मी तुम्हाला आज्ञा देते की आजपासून तुम्ही या वेळी तुमची मधुर गाणी गाऊन दिवसाच्या आगमनाची वर्दी द्या.” तिच्या शेजारी एक कोंबडा उभा होता. ती त्याला म्हणाली, “रात्रीचा रखवालदार म्हणून मी तुझी आजपासून नेमणूक करते. तुझे आरवण्याने रात्रीची गाज राहील आणि इतरांना समजेल की मादृगडा येते आहे.” अगदी आजपर्यंत ब्राझीलमध्ये पहाटेला मादृगडा म्हटले जाते. कोंबडा पहाट व्हायला आली की तिची वाट पाहणाऱ्या पक्ष्यांना इशारा देतो. त्यावेळी पक्षी सुश्राव्य गाणी म्हणतात आणि पहाटतारा मादृगडाचा राजा म्हणून आकाशावर राज्य करतो. अशा तऱ्हेने पृथ्वीतलावर रात्र व्हायला लागली.

मात्र आवाजांना घाबरून सेवकांनी महासर्पाची आज्ञा भंग केली. त्यांनी ते गाठोडे त्यांच्या मालकिणीच्या समोर उघडले नाही त्याची शिक्षा त्यांना मिळाली. त्या तीन सेवकांचे माकडात रुपांतर झाले. गाठोड्याला लावलेले मेणाचे सील त्यांनी तोंडाने तोडले होते. त्याची खूण म्हणून त्यांच्या आणि त्यांच्या वंशजांच्या ओठांवर कायमचा व्रण आला. हा व्रण आजही आजही माकडांच्या ओठांवर बघायला मिळते. जगाच्या सुरुवातीला गाठोड्यातून रात्रीने जशी एकदम बाहेर उडी मारली तशी अजूनही ब्राझीलमध्ये एकदम रात्र होते आणि रात्र झाल्यावर सगळे निशाचर प्राणी, पक्षी आणि रातकिडे सूर्यास्त समूहगान करू लागतात.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी

सिंह आणि शिकारी

🔶गोष्टीचे नाव-सिंह आणि शिकारी

🔶अनुवादक- डॉ.तृप्ती लोणकर

🔶मूळ स्त्रोत-युरोपियन कथा

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.एका घनदाट जंगलात अनेक प्राणी सुखासमाधानाने रहात होते.त्या जंगलाच्या जवळच एक छोटेसे टुमदार गाव होते. रामराव पाटील त्या गावाचे  पाटील होते.रामरावाना तीन चार मुले होती.त्यापैकी  'कुशल'त्यांचा लाडका मुलगा होता.

कुशल हा नावाप्रमाणेच अत्यंत हुशार होता.सगळ्या पंचक्रोशीत कुशल सारखा निष्णात शिकारी नव्हता.जेव्हा कुशल आपला भाला,बर्ची ,धनुष्य-बाण, घेऊन शिकारीला निघे, त्यावेळी इतर शिकारी मनात म्हणत, "आता आपल्याला कसली शिकार मिळणार!सगळ्यात जास्त मांस हाच घेऊन येईल." कुशल केवळ पोटापुरती शिकार न करता खेळ म्हणून प्राणी मारीत असे.असा क्रूर खेळ करण्यात त्याला आनंद होई.तो छाती फुगवून आपली शिकार गावात आणत असे.

कुशलच्या शिकार करण्याच्या नवीन नवीन पद्धतींमुळे कुशल इतर शिकाऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त मांस आणत असे.पण तो होता  स्वार्थी! आणलेले मांस सगळ्यांना न देता स्वतःकडेच ठेवे. आणि आपण कसा धाडसाने पाठलाग केला,प्राण्याची कशी भंबेरी उडवली आणि शेवटी त्याला खेळवत खेळवत कसा ठार केला, अशा बढाया मारत आणलेल्या मांसावर ताव मारत असे.गावकरी त्याच्या बढायांना कंटाळले होते.

रामरावांना हे कळत असे; पण कुशलला उपदेश म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी होते.ते नेहमी कुशलला बजावत, "कुशल,थोडक्यात समाधान मानावे,अति प्राणी मारून निसर्गाचा समतोल ढासळवू नये."पण कुशल," काय वैताग आहे! सारखे उपदेशच करतात." म्हणून रामरावांच्या बोलण्याकडे काणाडोळा करीत असे.'

अशा या क्रूर,निडर,आणि चलाख कुशलची जंगलातील प्राण्यांनी  दहशत घेतली  होती.आपली संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत असल्याचे पाहून प्राण्याची पंचायत चिंतित झाली होती.कुशलला कसे रोखावे?" हा त्यांच्या समोर गहन प्रश्न होता. त्यांनी कुशलला रोखण्यासाठी अनेक उपाय योजले पण कुशलने त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाचा धुव्वा उडवला होता.त्याने आपल्या चतुराईने प्राण्याना सळो की पळो करून सोडले होते.

सगळ्या प्राण्यांची  त्यांचे राजे 'शेरसिंग' महाराजांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावली गेली. मुद्दा एकच! कुशल शिका-याचा त्रास कसा थांबवायचा? प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनुसार उपाय सुचवत होता.पण चतुर मंत्री लांडगेराव त्यातील बारीक सारीक त्रुटी दाखवत होते.सगळे अगदी हतबुद्ध झाले होते.शेवटी शेरसिंग महाराज उभे राहिले."प्रजाजनहो!आपण सगळ्या प्रकारचे उपाय करून पाहिले पण माणसाला माणसाच्याच पद्धतीने  नामोहरम करायला हवे असे आमचे मत आहे." त्यासाठी मला आपल्या मादी वर्गाची मदत लागेल कोण तयार आहे मदत करायला!" शेरसिंग महाराज म्हणाले.   सगळा माद्यांचा कळप आपापसात बोलू लागला पण निर्णय काही होईना.

शेवटी महाराणी सिंहावती बाईसाहेब उठल्या आपल्या शेपटीचा फुलोरा सावरत उभ्या रहिल्या," महाराज!माझ्या प्रजाजनांसाठी मी माझे जीवन अर्पित करण्यासही तयार आहे आपण योजना सांगावी."सिंहावतीबाई विनम्रतेने म्हणाल्या.शेरसिंग महाराजांनी  महाराणी सिंहावती बाईंना कामगिरीवर रवाना केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी कुशल नेहमी प्रमाणे शिकारीला जायला तयार झाला.त्याने आपली सगळी शस्त्रे गोळा केली.तेवढ्यात रामराव तेथे आले "बाळ कुशल"त्यांनी थरथरत्या स्वरात हाक मारली,"आज तू शिकारीला जाऊ नकोस!  सिंहाने तुला ठार मारले आहे असे मी स्वप्नात पाहिले .तेव्हा आज तू जावू नकोस रे बाळा!"रामराव काकुळतीला येऊन सांगत होते. पण कुशल मात्र बेदरकार पणे हसत म्हातार बाबा तुम्ही म्हातारे झालात कसले भित्रे आहात हो"अस म्हणून त्यांची टर उडवत निघून गेला.
              
त्याही दिवशी कुशल भरपूर शिकार करून घरी येत असताना.त्याला झाडामागे काहीतरी सळसळ झाल्याचा आवाज आला त्याला वाटले चला आयती शिकार मिळतेय कशाला सोडा तो सावधपणे तिकडे धावला.पहातो तर काय हातात फळांची करंडी घेऊन एक सुंदर मुलगी तिथे उभी होती. "आपण कोण आहात?" कुठे राहता?" नाव काय आपलं?", कुशलने एका दमात सगळे प्रश्न विचारून टाकले.
" मी त्या दूSSरच्या गावात राहते. माझ नाव परी !  तुम्ही कुशल शिकारी का? तुम्ही एक निष्णात शिकारी आहात. असं
आमच्या गावात बोललं जातं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेय!" परी म्हणाली. आपली प्रशंसा ऐकून कुशलला आभाळ ठेंगणं वाटू लागलं. "आता संध्याकाळ झाली आहे माझ गाव जवळच आहे. चला तिकडे जाऊ" कुशल म्हणाला.

परी आणि कुशल दोघे कुशलच्या घरी आले. तेव्हा रामरावांनी आपला मुलगा घरी सुखरूप पोहोचल्याच्या आनंदात परीकडे  फारसं लक्ष दिलं नाही.आपलं स्वप्न खोटं ठरलं म्हणून ते देवाचे आभार मानत राहिले. कुशलला परी खूप आवडली. त्याने मागचा पुढचा कसलाही विचार न करता परीशी लग्न करायचे ठरवले.पण परीने त्याला तिच्या वडिलांची परवानगी घेण्याचा आग्रह  परीला म्हणाला,"चल आपण तुझ्या वडिलांकडे जाऊ!" तो आपली शस्त्रे गोळा करू लागला. परी हसून म्हणाली," मला लग्नाची मागणी घालण्यासाठी जातोस की शिकारीसाठी?अरे माझे वडील ही हत्यारे बघून घाबरून जातील.तेव्हा हत्यारे न घेताच चल." परीच्या सांगण्याप्रमाणे कुशल निघाला.
          
दोघेही गप्पाटप्पा करत कधी घनदाट जंगलात शिरले, ते कुशलला कळलेच नाही. काही क्षणातच परीने आपले सिंहावतीचे रूप घेतले. कुशलला  काही कळून तो सावध होण्याआधीच त्याला ठार मारले.
रात्र होत आली तरी आपला मुलगा परत आला नाही हे पाहून रामराव गावक-यांना घेऊन कुशलला शोधत जंगलात आले तर सिंहावती बाईसाहेबांनी मारून टाकलेला कुशल त्यांना दिसला. त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नाही.पण जंगलातील प्राणी आनंदविभोर होऊन नाचत होते.त्यांच्या राजा राणीने मिळून प्राणिजनांवरचं संकट नष्ट केलं होतं.
                   
धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी