Wednesday, November 14, 2018

सशाचे शेपूट

🔶गोष्टीचे नाव-सशाचे शेपूट

🔶अनुवादक- डॉ.वृषाली देहाडराय

🔶मूळ स्त्रोत-डॅनिश कथा

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा सशाला लांब शेपूट होते. पण मांजरीला मात्र शेपूटच नव्हते. ती सशाच्या शेपटाकडे नेहमी हेव्याने बघायची कारण तिला तसं शेपूट हवं होतं. हा ससा एक निष्काळजी आणि अविचारी प्राणी होता. एके दिवशी तो शांतपणे झोपला होता. त्याचे झुबकेदार शेपूट मागे लोंबत होते. तिथे मांजरीबाई एक धारदार सुरी घेऊन आल्या आणि त्यांनी एकाच झटक्यात सशाचे शेपूट कापून टाकले.

मांजरीबाई फारच चपळ होत्या. त्यांनी ते शेपूट त्यांच्या अंगाला जवळजवळ शिवूनच टाकले होते, तेवढ्यात ससेभाऊ जागे झाले आणि मांजरीबाई काय करताहेत हे त्यांनी पाहिले. “तुला असं नाही का वाटत की हे शेपूट तुझ्यापेक्षा माझ्या अंगावर जास्त खुलून दिसतयं?” मांजरीबाईनी विचारले. “हो. खरंच हे शेपूट माझ्यापेक्षा तुझ्या अंगावर जास्त चांगलं दिसतयं.” उदार आणि नि:स्वार्थी सशाने उत्तर दिले. “नाहीतरी ते माझ्यासाठी नको तितके लांबच होते. आणि मी आता काय करणार आहे ते तुला सांगतो. तू जर माझ्या शेपटाच्या बदल्यात तुझी धारदार सुरी मला दिलीस तर मी हे शेपूट तुझ्याकडे राहू देईन.” मांजरीने ससेभाऊंना आपली सुरी दिली आणि ती घेऊन ते घनदाट जंगलाकडे रवाना झाले.

“माझे शेपूट गेले पण मला सुरी मिळाली.” तो म्हणाला, “मला आता नवीन शेपूट मिळेल किंवा त्यासारखेच दुसरे काहीतरी छान मिळेल.” जंगलातून बराच वेळ उड्या मारत ससा पुढे चालला होता. सरतेशेवटी त्याला एक म्हातारा भेटला. तो गवताच्या टोपल्या विणत होता. टोपल्यांना लागणारे गवत तो दातांनी तोडत होता. ससा त्याच्या जवळ गेल्यावर म्हाताऱ्याने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले. त्याला दिसले की सशाच्या तोंडात सुरी होती. “अहो ससेभाऊ,” म्हातारा म्हणाला, “कृपया तुमची ती धारदार सुरी मला द्याल का? हे गवत दातांनी तोडणे खूपच अवघड पडतंय.” ससेभाऊंनी आपली सुरी त्या म्हाताऱ्याला दिली. त्याने त्या सुरीने गवत कापायला सुरुवात केली. गवत कापता-कापता सुरीचे एकदम दोन तुकडे झाले. “अरे देवा,” ससा ओरडला. “आता मी काय करू? तू माझी एवढी मस्त नवीन सुरी मोडलीस.” “माफ कर. मला वाईट वाटतंय. पण मी मुद्दामहून नाही केलं.” त्यावर ससेभाऊ म्हणाले, “या मोडक्या सुरीचा आता मला काही उपयोग नाही. ही जरी मोडकी असली तरी कदाचित तुला त्याचा उपयोग होईल. मी आता काय करणारे ते तुला सांगतो. जर तू मला सुरीच्या बदल्यात तुझी एक टोपली दिलीस तर ही सुरी मी तुला देईन.” म्हाताऱ्याने सशाला एक टोपली दिली आणि ती घेऊन तो दाट जंगलातून जाऊ लागला.

“माझे शेपूट गेले, पण मला सुरी मिळाली. माझी सुरी गेली पण मला टोपली मिळाली.” तो म्हणाला. “आता मला नवीन शेपूट किंवा त्याच्यासारखेच दुसरे काहीतरी चांगले मिळेल. ससेभाऊ टुणूक टुणूक उड्या मारत दाट जंगलातून चालले होते. शेवटी ससेभाऊ एका मोकळ्या जागेत येऊन पोचले. तिथे एक म्हातारी पालेभाजी खुडण्यात गढून गेली होती. भाजी गोळा करून ती तिच्या कपड्यांच्या ओच्यात ठेवत होती. टोपली घेउन उड्या मारत जाणाऱ्या सशाकडे तिने बारकाईने बघितले. “ओ ससेभाऊ,” ती म्हणाली, “तुम्ही कृपा करून तुमची टोपली काही वेळाकरता मला वापरायला द्याल का?” सशाने त्याची टोपली म्हातारीला दिली. म्हातारी त्या टोपलीत पालेभाजी गोळा करू लागली. तेवढ्यात टोपलीचं बूड निघून आलं. “अरे देवा,” ससा ओरडला. आता मी काय करू? तू माझ्या एवढ्या सुंदर टोपलीचं बूड मोडलंस.” म्हातारी म्हणाली, “माफ करा. मला खूप वाईट वाटतंय. पण मी मुद्दामहून नाही केलं.” तेव्हा ससेभाऊ म्हणाले, “मी आता काय करणार आहे ते तुला सांगतो. जर तू मला थोडी पालेभाजी देणार असशील तर मी ही मोडकी टोपली तुझ्याकडे राहू देईन.” त्या म्हातारीने सशाला पालेभाजी दिली आणि ती घेऊन तो उड्या मारत गेला.

ससा म्हणाला, “माझे शेपूट गेले, पण मला सुरी मिळाली. माझी सुरी गेली, पण मला टोपली मिळाली. माझी टोपली गेली, पण त्या बदल्यात मला पालेभाजी मिळाली. सशाला भूक लागली होती. पालेभाजीचा वासही छान येत होता. त्याने भाजीचा एक घास घेतला. त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच इतके चविष्ट अन्न खाल्ले होते. “माझे शेपूट गेले त्याची मला काही पर्वा नाही.” तो म्हणाला, “त्यापेक्षा जास्त आवडणारे काहीतरी मला मिळाले आहे." त्या दिवसापासून आजपर्यंत कोणत्याही सशाला शेपूट नाही.

पण आजपर्यंत कोणत्याही सशाला शेपूट नसल्याची खंत वाटलेली नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत ज्याला पालेभाजी आवडत नाही असा एकाही ससा आढळलेला नाही. सगळे ससे भरपूर पालेभाजी मिळाल्याने अगदी खूश आणि समाधानी असतात.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी

No comments:

Post a Comment