🔶गोष्टीचे नाव- फक्त ८७ वर्षांची तरुण विद्यार्थिनी- 'रोझ'
🔶अनुवादक-सुचिकांत वनारसे
🔶मूळ स्रोत-युरोपियन कथा
कॉलेजचा पहिलाच दिवस!! सर्व काही नवं नवं.. पहिलंच लेक्चर! आमच्या सरांनी प्रथम स्वतःची ओळख करून दिली आणि लागलीच, "तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांची ओळख करून घेण्याचा कार्यक्रम पार पाडा. मी ५ मिनिटात येतो." म्हणत कल्टी मारली. पुढे अगदी तासभर मास्तुरे गायबच!! मग काय! पूर्ण वर्गात गडबड-गोंधळ सुरू झाला...
मी जिराफाप्रमाणे मान उंच करून हसरा चेहरा करून टेहळणी करत, माझ्याशी बोलण्यात कुणी उत्सुक आहे का हे पाहत असतानाच माझ्या खांद्याला हाताचा एक सौम्य स्पर्श जाणवला...मी वळून बघितलं तर ,चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेली एक अतिशय वृद्ध सुंदरी माझ्याकडे टक लावून बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न स्मित जणू काही तिच्या बोलक्या व्यक्तिमत्त्वाची साक्षच देत होतं.
तिनेच सुरुवात केली, "कसा आहेस चिकणू? माझं नाव रोझ! घाबरू नकोस मी फक्त ८७ वर्षांची आहे." मी काही बोलायच्या आतच तिने मला जवळ घेतलं. मी देखील मोठ्या उत्साहाने हसत प्रतिसाद दिला.
मी अहो जाहो वगैरे भानगडीत न पडता थोडं मिश्किलपणेच म्हणालो, "इतक्या लहान वयात तू कॉलेजमध्ये कशी काय?" ती तर माझी खरोखरच नानी निघाली, म्हणते कशी, "मी मस्तं श्रीमंत बापाचा पोरगा कटवणार आहे, मग लग्न करणार आणि २-४ गुटगुटीत पोरांची आई होऊन आरामात आयुष्य काढणार!!!"
दोघे खळखळून हसलो. मी पुन्हा विचारलं.. कारण रोझला या वयात कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायची प्रेरणा कशी काय मिळाली हे जाणून घेण्यासाठी मी प्रचंड उतावळा झालो होतो.
ती उत्तरली, "माझं कॉलेजमध्ये जायचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, आता पूर्ण करते आहे." आणि तिने डोळे मिचकावले.
लेक्चर संपल्यावर मस्तपैकी आम्ही दोघे, कॅन्टीनमध्ये गेलो. चहा आणि बन मस्क्यावर ताव मारला आणि अर्थातच आम्ही दोघे जाम भारी मित्र बनलो. जवळपास पुढचे ३-४ महिने आम्ही कॉलेज सुटल्यावर एकत्रच घरी जात असू. बस स्टँड म्हणजे आमच्या गप्पांचा अड्डाच झाला होता. न थकता, प्रचंड गप्पा मारायचो आम्ही! रोझ म्हणजे साक्षात टाईम मशीन होती. तिचे अनुभव, तिचे विचार ऐकताना मी अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जायचो.
अल्पावधीतच रोझ कॉलेजकट्टयावरची अत्यंत प्रतिष्ठित सदस्य झाली. जिथे जाईल तिथे ती नवनवीन मित्र-मैत्रिणी बनवत असे. तिला छान रहायला आवडायचं. ती कट्टयावर आली की नुसती धमाल असे. सर्व मित्रमैत्रिणींचं लक्ष फक्त तिच्यावर असायचं. ती तिचं आयुष्य पूर्णपणे उपभोगत होती.
सत्राच्या शेवटी आम्ही रोझला आमच्या क्रिकेट क्लबच्या मेजवानीमध्ये भाषणाकरता आमंत्रित केलं होतं. भाषणे सुरू झाली. रोझचं नाव उच्चारलं गेलं..अतिशय आत्मविश्वासाने ती व्यासपीठावर गेली.
तिच्या भाषणाची तयारी चांगली झाली होती; पण नेमकी माशी शिंकली. भाषणाचे मुद्दे लिहिलेल्या चिठ्ठ्या तिच्या हातातून खाली पडल्या. थोडंसं खजिल होऊन माईकपाशी जाऊन ती म्हणाली, "मला माफ करा, मी भाषणाच्या वेळी जरा नर्व्हस असते. सध्या उपवासामुळे मी बीयर सोडली आहे आणि ही व्हिस्की उतरता उतरत नाही!"
श्रोत्यांमध्ये एकच हशा पिकला. तिने खाकरून घसा साफ केला आणि बोलायला सुरुवात केली, "आपण म्हातारे होतो म्हणून खेळणं थांबवत नाही तर आपण खेळणं थांबवतो म्हणून म्हातारे होतो! चिरतरुण राहण्याकरता,आनंदी राहण्याकरता, आयुष्यात यशस्वी होण्याकरता काही गुपितं लक्षात ठेवा..तुम्हाला रोज हसावं लागेल, व्यंग शोधावं लागेल. तुम्हाला स्वप्न पहावी लागतील, स्वप्न पाहायचं सोडलं की तुम्ही संपून जाल! समाजात आपण अनेक लोक पाहतो जे खरंतर कधीच मृत पावले आहेत; पण याची त्यांना कल्पनाच नाही. वयाचा आणि वैचारिक प्रगल्भतेचा काहीही संबंध असत नाही. तुम्ही १९ वर्षांचे असाल, वर्षभर काहीही न करता नुसत्या झोपा काढल्या तरी २० वर्षांचे व्हाल. मी ८७ वर्षांची असेल आणि काहीही न करता वर्षभर तशीच पडून राहिले तर ८८ वर्षांची होईल. वयाने मोठं होणं ही तर नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यासाठी काहीच अक्कल लागत नाही. हा! पण या आपल्या आयुष्याच्या प्रवासात जिथे जिथे संधी मिळेल तिथे त्या संधीचा उपयोग करून अनुभवाने, हुशारीने, वैचारिक प्रगल्भतेने देखील आपण मोठं होणं अपेक्षित आहे. अनेक वयस्कर लोकांना आपण आयुष्यात काय केलं याचा पश्चाताप, खंत कधीच नसते उलट आपण आयुष्यात काय केलं नाही याची सल त्यांच्या मनात सतत बोचत राहते. हे सतत पश्चाताप करणारे आणि असमाधानी लोकच मृत्यूला सतत घाबरत असतात."
भाषणाच्या शेवटी तिने 'द रोझ' हे तिचं आवडतं गीत गायलं शिवाय आमच्यापैकी प्रत्येकाला ते गीत शिकून घेऊन दैनंदिन जीवनात ते गीत जगायला सांगितलं.
वर्षाखेरीस रोझने पदवी अभ्यास पूर्ण केला आणि एकाच आठवड्यात शांतपणे कायमचे डोळे मिटले!
'तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी कधीही खूप उशीर झालाय असं समजू नका.' हे शिकवणाऱ्या स्त्रीच्या अंत्यसंस्काराला दोन हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी
प्रेरणादायी
ReplyDelete