🔶गोष्टीचे नाव-सिंह आणि शिकारी
🔶अनुवादक- डॉ.तृप्ती लोणकर
🔶मूळ स्त्रोत-युरोपियन कथा
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.एका घनदाट जंगलात अनेक प्राणी सुखासमाधानाने रहात होते.त्या जंगलाच्या जवळच एक छोटेसे टुमदार गाव होते. रामराव पाटील त्या गावाचे पाटील होते.रामरावाना तीन चार मुले होती.त्यापैकी 'कुशल'त्यांचा लाडका मुलगा होता.
कुशल हा नावाप्रमाणेच अत्यंत हुशार होता.सगळ्या पंचक्रोशीत कुशल सारखा निष्णात शिकारी नव्हता.जेव्हा कुशल आपला भाला,बर्ची ,धनुष्य-बाण, घेऊन शिकारीला निघे, त्यावेळी इतर शिकारी मनात म्हणत, "आता आपल्याला कसली शिकार मिळणार!सगळ्यात जास्त मांस हाच घेऊन येईल." कुशल केवळ पोटापुरती शिकार न करता खेळ म्हणून प्राणी मारीत असे.असा क्रूर खेळ करण्यात त्याला आनंद होई.तो छाती फुगवून आपली शिकार गावात आणत असे.
कुशलच्या शिकार करण्याच्या नवीन नवीन पद्धतींमुळे कुशल इतर शिकाऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त मांस आणत असे.पण तो होता स्वार्थी! आणलेले मांस सगळ्यांना न देता स्वतःकडेच ठेवे. आणि आपण कसा धाडसाने पाठलाग केला,प्राण्याची कशी भंबेरी उडवली आणि शेवटी त्याला खेळवत खेळवत कसा ठार केला, अशा बढाया मारत आणलेल्या मांसावर ताव मारत असे.गावकरी त्याच्या बढायांना कंटाळले होते.
रामरावांना हे कळत असे; पण कुशलला उपदेश म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी होते.ते नेहमी कुशलला बजावत, "कुशल,थोडक्यात समाधान मानावे,अति प्राणी मारून निसर्गाचा समतोल ढासळवू नये."पण कुशल," काय वैताग आहे! सारखे उपदेशच करतात." म्हणून रामरावांच्या बोलण्याकडे काणाडोळा करीत असे.'
अशा या क्रूर,निडर,आणि चलाख कुशलची जंगलातील प्राण्यांनी दहशत घेतली होती.आपली संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत असल्याचे पाहून प्राण्याची पंचायत चिंतित झाली होती.कुशलला कसे रोखावे?" हा त्यांच्या समोर गहन प्रश्न होता. त्यांनी कुशलला रोखण्यासाठी अनेक उपाय योजले पण कुशलने त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाचा धुव्वा उडवला होता.त्याने आपल्या चतुराईने प्राण्याना सळो की पळो करून सोडले होते.
सगळ्या प्राण्यांची त्यांचे राजे 'शेरसिंग' महाराजांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावली गेली. मुद्दा एकच! कुशल शिका-याचा त्रास कसा थांबवायचा? प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनुसार उपाय सुचवत होता.पण चतुर मंत्री लांडगेराव त्यातील बारीक सारीक त्रुटी दाखवत होते.सगळे अगदी हतबुद्ध झाले होते.शेवटी शेरसिंग महाराज उभे राहिले."प्रजाजनहो!आपण सगळ्या प्रकारचे उपाय करून पाहिले पण माणसाला माणसाच्याच पद्धतीने नामोहरम करायला हवे असे आमचे मत आहे." त्यासाठी मला आपल्या मादी वर्गाची मदत लागेल कोण तयार आहे मदत करायला!" शेरसिंग महाराज म्हणाले. सगळा माद्यांचा कळप आपापसात बोलू लागला पण निर्णय काही होईना.
शेवटी महाराणी सिंहावती बाईसाहेब उठल्या आपल्या शेपटीचा फुलोरा सावरत उभ्या रहिल्या," महाराज!माझ्या प्रजाजनांसाठी मी माझे जीवन अर्पित करण्यासही तयार आहे आपण योजना सांगावी."सिंहावतीबाई विनम्रतेने म्हणाल्या.शेरसिंग महाराजांनी महाराणी सिंहावती बाईंना कामगिरीवर रवाना केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी कुशल नेहमी प्रमाणे शिकारीला जायला तयार झाला.त्याने आपली सगळी शस्त्रे गोळा केली.तेवढ्यात रामराव तेथे आले "बाळ कुशल"त्यांनी थरथरत्या स्वरात हाक मारली,"आज तू शिकारीला जाऊ नकोस! सिंहाने तुला ठार मारले आहे असे मी स्वप्नात पाहिले .तेव्हा आज तू जावू नकोस रे बाळा!"रामराव काकुळतीला येऊन सांगत होते. पण कुशल मात्र बेदरकार पणे हसत म्हातार बाबा तुम्ही म्हातारे झालात कसले भित्रे आहात हो"अस म्हणून त्यांची टर उडवत निघून गेला.
त्याही दिवशी कुशल भरपूर शिकार करून घरी येत असताना.त्याला झाडामागे काहीतरी सळसळ झाल्याचा आवाज आला त्याला वाटले चला आयती शिकार मिळतेय कशाला सोडा तो सावधपणे तिकडे धावला.पहातो तर काय हातात फळांची करंडी घेऊन एक सुंदर मुलगी तिथे उभी होती. "आपण कोण आहात?" कुठे राहता?" नाव काय आपलं?", कुशलने एका दमात सगळे प्रश्न विचारून टाकले.
" मी त्या दूSSरच्या गावात राहते. माझ नाव परी ! तुम्ही कुशल शिकारी का? तुम्ही एक निष्णात शिकारी आहात. असं
आमच्या गावात बोललं जातं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेय!" परी म्हणाली. आपली प्रशंसा ऐकून कुशलला आभाळ ठेंगणं वाटू लागलं. "आता संध्याकाळ झाली आहे माझ गाव जवळच आहे. चला तिकडे जाऊ" कुशल म्हणाला.
परी आणि कुशल दोघे कुशलच्या घरी आले. तेव्हा रामरावांनी आपला मुलगा घरी सुखरूप पोहोचल्याच्या आनंदात परीकडे फारसं लक्ष दिलं नाही.आपलं स्वप्न खोटं ठरलं म्हणून ते देवाचे आभार मानत राहिले. कुशलला परी खूप आवडली. त्याने मागचा पुढचा कसलाही विचार न करता परीशी लग्न करायचे ठरवले.पण परीने त्याला तिच्या वडिलांची परवानगी घेण्याचा आग्रह परीला म्हणाला,"चल आपण तुझ्या वडिलांकडे जाऊ!" तो आपली शस्त्रे गोळा करू लागला. परी हसून म्हणाली," मला लग्नाची मागणी घालण्यासाठी जातोस की शिकारीसाठी?अरे माझे वडील ही हत्यारे बघून घाबरून जातील.तेव्हा हत्यारे न घेताच चल." परीच्या सांगण्याप्रमाणे कुशल निघाला.
दोघेही गप्पाटप्पा करत कधी घनदाट जंगलात शिरले, ते कुशलला कळलेच नाही. काही क्षणातच परीने आपले सिंहावतीचे रूप घेतले. कुशलला काही कळून तो सावध होण्याआधीच त्याला ठार मारले.
रात्र होत आली तरी आपला मुलगा परत आला नाही हे पाहून रामराव गावक-यांना घेऊन कुशलला शोधत जंगलात आले तर सिंहावती बाईसाहेबांनी मारून टाकलेला कुशल त्यांना दिसला. त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नाही.पण जंगलातील प्राणी आनंदविभोर होऊन नाचत होते.त्यांच्या राजा राणीने मिळून प्राणिजनांवरचं संकट नष्ट केलं होतं.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी
No comments:
Post a Comment