🔶गोष्टीचे नाव-माकड व डॉल्फिन
🔶अनुवादक- वृषाली गोखले
🔶मूळ स्रोत:-ग्रीक लोककथा
अथेन्सच्या देशाचे लोक फार वर्षांपासून उत्तम प्रवासी म्हणून गणले जातात.या लोकांच्यात एक पद्धत होती की, स्वतःच्या मनोरंजनासाठी आपला एक आवडता प्राणी बरोबर नेणे! या आवडीच्या प्राण्यांमध्ये लॅपडॉग व माकड हे प्रमुख होते.
एकदा असं झालं की,अथेन्समधील एक माणूस पूर्वेकडून जहाजामधून प्रवास करत येत होता.त्याच्यासोबत त्याचे माकडही होते. प्रवासात त्यांना एका वादळाला तोंड द्यावे लागले. या वादळात ते जहाज उलटेच झाले होते. प्रत्येकाने जहाजावरील विविध लाकडी सामानाचा उपयोग स्वतःला वाचवण्यासाठी केला.कोणी लाकडी फळ्यांचा वापर करून लटकूनच राहिले, तर कोणी पोहून जायचा प्रयत्न केला.
या प्रवाशासोबत जे माकड होते त्याला पोहता येत नव्हते फारसे..त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले.पाण्यातील एका डॉल्फिन माशाने त्याला वाचवले.त्या डॉल्फिन माशाला खात्रीने असे वाटले की ते माकड म्हणजे कोणी माणूसच आहे..
जेव्हां वादळ थोडे शांत झाले,तेव्हां डॉल्फिनने माकडाला विचारले,"तू अथेन्स मधून आलास का ?"..हा प्रश्न ऐकल्यावर,त्या माकडालाही डॉल्फिनच्या मनातले कळले आणि त्याने क्षणभर विचार केला की, 'आपण माणूसच आहोत,असे भासवणेच शहाणपणाचे आहे' ..माकड म्हणाले, " होय,मी खरंच अथेन्सचा आहे..एका खास कुटुंबातून आलो आहे" त्यावर डॉल्फिनने विचारले,
"अरे वा, मग तुला 'पिरायस'काय ते माहिती असेल? " अथेन्स लोकांनी त्यांच्या एका बंदराला 'पिरायस' हे नांव दिले आहे हे त्या माकडाला माहीत नव्हते.त्याला वाटले की,डॉल्फिन कुठल्याशा एक कुटुंबाबद्दल बोलत आहे,म्हणून मग माकडानेही उत्तर दिले, " होय,रे,त्या (पिरायस )कुटुंबाशी माझी छान मैत्री आहे. तू जर मला सुरक्षितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवलेस तर ते तुला निश्चितपणे छानसे बक्षीस देतील..."
माकडाच्या ह्या उत्तरावरून डॉल्फिनने तात्काळ जाणले की, माकड आपणास फसवत आहे..आणि त्याने जोरात समुद्रात सूर मारला आणि माकड वाचू शकले नाही.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादिनी
No comments:
Post a Comment